तोतया पोलिसाने केली वृद्धाची फसवणूक - नाकाबंदी चेकिंगच्या बहाण्याने केली अंगठी लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - शिंगणापुर रोड, भाजी मंडई, कोळकी ता. फलटण येथे, पोलीस असल्याची बतावणी करत, नाकाबंदी चेकिंग चालू असल्याचे सांगून, वृद्ध व्यापाऱ्याची अंगझडती घेतली, व वृद्धाची ७ ग्रॅम ९० मिली वजनाची सोन्याची अंगठी हात चालाकीने लंपास करून फसवणूक केल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शामजी जयरामभाई भानुशाली वय ७५ वर्षे, व्यावसाय बारदान खरेदी विक्री, रा. सावतामाळी नगर कोळकी ता. फलटण यांचे योगेश टेलर्स नावाचे दुकान वनदेवशेरी, कोळकी ता. फलटण येथे आहे. शामजी भानुशाली हे दिनांक १८ मे २०२४ रोजी जेवण करून दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास शिंगणापुर रोड, भाजी मंडई, कोळकी ता. फलटण जि.सातारा येथून वनदेवशेरी येथील दुकानात चालले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागुन मोटार सायकलीवर एक अनोळखी इसम आला व त्याने भानुशाली यांना व त्यांच्या पाठीमागून चालत येणाऱ्या इसमास थांबवले, आणि, मी पोलीस आहे असे म्हणुन त्याने त्याचे जवळील आयडी कार्ड दाखविले व म्हणाला की, पुढे नाकाबंदी चेकिंग चालु आहे. असे म्हणुन चालत आलेल्या इसमास चेक केले व त्याचेकडे असलेले पैसे, अंगठी त्याचे रुमालात बांधुन रुमाल त्याचेकडे परत दिला. त्यानंतर त्या तोतया पोलिसाने भानुशाली यांची अंगझेडती घेऊन, भानुशाली यांच्या खिशातील रुमालात सर्व इतर सामान, रोख रक्कम ४०,०००/-रुपये व ७ ग्राम ९० मिली सोन्याची अंगठी ठेवली व रुमालाची गाठ मारुन ते भानुशाली यांच्याकडे परत दिला व मला सांभाळुन जावा असे सांगितले. त्यानंतर भानुशाली हे त्यांच्या योगेश टेलर्स नावाचे बारदान खरेदी विक्री दुकानात गेले व रुमालाची गाठ सोडुन पाहिले असता त्यामध्ये इतर सामान व रोख रक्कम ४०,०००/- रुपये दिसले. मात्र हातातील अंगठी दिसली नाही. २४ हजार रुपयांची किंमतीची ७ ग्राम ९० मिली सोन्याची अंगठी तोतया पोलिसाने लंपास केली असल्याची फिर्याद श्यामजी भानुशाली यांनी दिली आहे.
No comments