Breaking News

टंचाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे - प्रांताधिकारी सचिन ढोले

To combat the shortage, coordination should be done in all the departments and micro planning should be done - Provincial Officer Sachin Dhole

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण तालुक्यामध्ये मागील वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे तालुक्यातील जलस्त्रोत कोरडे ठणठणीत आहेत. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा टंचाईच्या काळामध्ये विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी यांनी स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी सतर्कता दाखवावी. टंचाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे. टंचाईच्या काळात हलगर्जीपणात खपवून घेतला जाणार नाही, जनतेला योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करून  सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रात्रंदिवस काम करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. 

    फलटण पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी निखिल मोरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये,तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, पशुसंवर्धन अधिकारी नंदकुमार फाळके, गावोगावचे ग्रामसेवक, तलाठी ,पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

    टंचाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देऊन सचिन ढोले म्हणाले सध्या तालुक्यामध्ये ८८ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे त्यापैकी ४० गावे ९० वाड्यावर २९ टॅंकरच्या माध्यमातून ६२३०१ लोक वस्तीला आणि ३६४०१  पशुधनासाठी ७७ खेपांच्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने, ठिक ठिकाणचे जल स्तोत्र अटल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत आहे. टँकरची मागणी वाढू लागली आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी टँकरची मागणी होत असलेल्या गावी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून अहवाल दिल्यानंतर तातडीने टँकर सुरू करण्याबरोबर टंचाई कमी करण्यासाठीचे अन्य उपाय तातडीने राबविता येतील.

    गावामध्ये पाणी उपलब्ध नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून टँकर सुरू केले जातात, त्यापूर्वी विंधन विहिरी, विहिरींचे अधिग्रहण केले जाते. बारा गावातील २० विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ज्यांच्या विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेलं आहे असे लोक स्वतः अधिक पाणी उपसा करतात. पाणी असूनही जनतेला पुरेसे पाणी मिळत जनतेची पाण्याची तहान भागल्यानंतर उर्वरित पाणी स्वतःसाठी वापरण्यास सहमती असते. मात्र ग्रामस्थांना पाणी मिळण्यात अडचणी येतात अशा तक्रारी येत आहे . पाणीपुरवठ्यासाठी जनतेची अडवणूक करणाऱ्या लोकांच्यावर प्रसंगी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून ३५३ कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ढोले यांनी दिले.

    फलटण नगर परिषदेच्या फीडिंग पॉइंट मधून रोज दहा लाख लिटर पाणी टँकर भरण्यासाठी वापरले जाते.सध्या कॅनॉल  बंद आहे.हीच परिस्थिती कायम राहिली तर फलटण शहराला पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते . यासाठी सुरवडी औद्योगिक वसाहत येथे टँकर फिडींग  पाॅईंट कार्यान्वित करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. जवळच्या फीडिंग पॉइंटवरून टँकर भरण्याच्या सुविधेमुळे टँकर खेपांचे अंतर कमी होण्याबरोबर टँकर खेपा गावोगावी वेळीच पोहोचू शकतील. 

    अनेक गावांमध्ये टँकर वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या तेव्हा याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी समन्वय साधून वेळेत खेपा पोहोचण्याच्या बाबतीत सतर्कता दाखवण्याच्या सूचनाही ढोले यांनी दिल्या. टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने करण्याबाबत वीज वितरण कंपनीने सकारात्मकता दर्शवली.

No comments