Breaking News

किरकोळ कारणावरुन नातेपुते येथे दोघांचा खून

Two people were killed in a relative's place for a minor reason

    नातेपुते   (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते फोंडशिरस रोडवरील महादेव मंदिराजवळ फोंडशिरस हद्दीत शुक्रवारी दि. १७ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोघांची हत्या झाली. झालेल्या वादात - दहिगाव तालुका माळशिरस येथील नारायण विठ्ठल जाधव (वय ४२) आणि दुर्योधन नवनाथ निकम - (वय २२ रा, चिकने वस्ती, दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अक्षय बोडरे यांनी इतर साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पोटात चाकूने भोसकून त्यांची हत्या करण्यात आली. बिअरबारमधील झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारी आणि खून यामध्ये झाले आहे.

    घटनेची माहिती नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना समजताच पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेतील संशयीत आरोपी गणेश खोमणे याला ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयीत आरोपी फरार आहेत. या दुहेरी खून प्रकरणाची घटना फोंडशीरस हद्दीत घडल्याने फोंडशीरस हद्दीतील नागरिकांत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. नातेपुते पोलीस ठाण्यात खूणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    नातेपुते पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १७ मे २०२४  रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास व सांय ४.३० वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील परमिट रूम येथे अक्षय बोडरे रा. फोंडशीरस व त्याचा दाजी या दोघांनी नारायण विठठल जाधव रा. चिकणेवस्ती दहीगांव ता. माळशिरस यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने, त्याचा जाब विचारण्यास राहुल बुधवले व 1) नारायण विठ्ठल जाधव 2) दुर्योधन नवनाथ निकम 3) बाळू कुंडलिक जाधव 4) विनोद पोपट गोरे सर्व चिकणेवस्ती दहीगांव ता माळशिरस असे अक्षय बोडरे याच्या पाठीमागुन मोटरसायकलवर जावुन सायं ५.४४ वाजण्याच्या सुमारास नातेपुते ते फोंडशिरस जाणाऱ्या बनात असलेल्या महोदव मंदीराजवळ गेलो असता, तेथे आरोपी नामे अक्षय बोडरे व त्याचा दाजी व इतर ६ अनोळखी मुले यांना अक्षय बोडरे यांने बोलावुन घेवून, आम्ही सर्वांनी त्याला मारहाण केली आहे असे सांगितलेनंतर, त्या सर्वांनी आम्हाला शिवीगाळी, धमकी, दमदाटी करुन, विटा मारुन जखमी केले व अनोळखी मुलांपैकी एका मुलाने अक्षय बोडरे यास चाकु सारखे धारधार हत्यार दिल्यानंतर, त्या हत्याराने अक्षय बोडरे याने नारायण विठ्ठल जाधव यांना उजवे बाजूचे छातीवर व डावे बाजूचे काखेचे खाली व दुर्योधन नवनाथ निकम यास डावे बाजूचे बरगंडीवर ते हत्यार खूपसून बाहेर काढून त्यांना जीवे ठार मारण्याचे उ‌द्देशाने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

No comments