Breaking News

२३ किलो गांजा पकडला ; एकूण ७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

23 kg of ganja seized; A total of 7 lakh 27 thousand rupees seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ - बारामती तालुक्यातून फलटण तालुक्यात गांजाची तस्करी करत असलेल्या टोळीला, फलटण ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून, रंगेहात पकडले.  यामध्ये ५ लाख ७७ हजार ५०० रुपये किंमतीचा २३ किलो वजनाचा गांजा व पल्सर मोटार सायकल असा एकूण ७ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. 

    सातारा जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक म समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहिम सुरु केली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे सीमेला लागुन पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा असल्यामुळे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने यांनी मागील काही दिवसांपासुन सदर भागात विशेष लक्ष केंद्रीत करुन, बातमीदारांचे जाळे तयार केले आहे. आज. दि. ३/६/२०२४ रोजी त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम एका बजाज पल्सर मोटार सायकलवरुन बारामतीहुन फलटणकडे मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. सदर बातमी प्राप्त होताच पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छापा कारवाईचे नियोजन करुन सांगवी, ता. फलटण गावचे हद्दीत बारामती- फलटण रोडलगत आपले अधिनस्त पोलीस अमंलदार यांचे समवेत सापळा लावला होता.

    आज दि. ३/६/२०२४ रोजी १२.०५ वाजण्याच्या सुमारास इसम नामे १. आशिष जालिंदर पवार रा. पाहुणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे २. कुणाल बाळासो कांबळे रा. शारदानगर, माळेगाव कॉलनी, ता. बारामती, जि. पुणे हे एका, नंबरप्लेट नसलेल्या, बजाज पल्सर मोटार सायकलवरुन सुमारे ५ लाख ७७ हजार ५०० रुपये किंमतीचा व २३ कि. ग्रॅ. वजनाचा गांजा एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यातुन बारामतीहुन फलटणकडे घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या सापळा पथकातील पोलीसांना मिळुन आले आहेत. सदरचा गांजा ते अक्षय चव्हाण रा. शिरवली, ता. बारामती याचे सांगणेवरुन फलटणकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी तपासामध्ये सांगितले आहे. सदरवेळी दुसऱ्या मोटार सायकलवरुन त्यांना साथ करणारे करण मदने रा. शिरवली, ता. बारामती व दुसरा एक अनोळखी इसम हे घटनास्थळावरुन त्यांचे मोटार सायकलवरुन पळुन गेले आहेत. सदर छापा कारवाईमध्ये एकुण सुका गांजा व विनानंबरप्लेटची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ७,२७,५००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    पोलीस अधीक्षक  समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, मच्छिंद्र पाटील, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम, संदीप मदने, योगेश रणपिसे, अमोल जगदाळे, तुषार आडके, श्रीकांत खरात, हनुमंत दडस, विक्रम कुंभार, सुरज काकडे, अमोल देशमुख, प्रिती काकडे, रशिदा पठाण यांनी सदरची कारवाई केली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा नोंद असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हे करीत आहेत. 

No comments