संशयास्पद ड्रोन दिसले तर पोलिसांशी संपर्क करा - पोलीस निरीक्षक सुनील महाडिक
फलटण - नीरा नदीकाठच्या गावांमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद ड्रोन उडताना दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, यासाठी खास पथकेही तैनात केली आहेत, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपल्या परिसरात असे संशयस्पद ड्रोन उडत असेल तर लगेच पोलिसांशी संपर्क साधावा आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
फलटण तालुक्यात निरा नदीपट्ट्यातील गावाच्या वरती ड्रोन उडताना दिसत आहेत. सदरचे ड्रोन बारामती तालुक्यात अनेक गावांमध्ये दिसून आलेले आहे. तसेच दौंड, सुपा या भागात सुद्धा दिसून आलेले आहेत.
सदर बाबत आम्ही बारामती तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहोत. बहुतेक हा प्रकार बारामती तालुक्यातील काही गावांमधूनच होत आहे, परंतु लाईट मुळे तो ड्रोन आपल्या भागात सुद्धा दिसून येत आहेत. बारामती तालुक्यात ड्रोन शोधण्यासाठी एक खास पथक तयार करण्यात आलेले आहे, त्यांच्याही आम्ही संपर्कात आहोत. सदर बाबत रात्रीची चार्टर्ड प्लेन फिरतात हे खरे आहे, बारामतीला या विमानाचे ट्रेनिंग सेंटर आहेत, प्लेन त्याच्या लाईटमुळे उंचावर असताना ड्रोन सारखेच दिसतात. जास्त खोल माहिती काढली असता, आता अमेझॉन फ्लिपकार्ट यावर सुद्धा ड्रोन खरेदी केले जाऊ शकतात व अनेक लोकांनी ऑनलाइन ड्रोन खरेदी केलेले आहेत. सदर ड्रोन हे फोटोग्राफीसाठी किंवा सर्वेसाठी वापरले जात आहेत. सदर बाबत अधिकृत माहिती काढण्याचे कामकाज सुरू आहे.
सदरचे ड्रोन हे चोरीसाठी वापरतात ही बातमी अफवा आहे. ड्रोन ने सर्वेक्षण करून रात्रीच्या वेळेस घरामधील काय सामान आहे हे पाहणे अशक्य आहे. त्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रशासना तर्फे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, कोणीही घाबरून जाऊ नये व आफवेतून कोणालाही मारहाण करू नये किंवा संशयित मिळाला तर व्यवस्थित चौकशी करावी. रात्रीच्या वेळेस खोडसाळ पणाने हे ड्रोन उडवत असावेत. याबाबत आम्ही सखोल माहिती घेत आहोत, आपल्या गावात किंवा परिसरात कोणाला याबाबतीत जर काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनास संपर्क करावा परंतु सर्व जनतेला विनंती करण्यात येत आहे कोणीही घाबरून जाऊ नये. फलटण ग्रामीण पोलिसचे स्टाफ दुचाकीवर सदर भागात गस्त करत आहेत. आपल्या भागात चार पाच किलोमीटर परिसरात असणारे ड्रोन धारकाची नावे ९८२३५६२२५५ नंबरला व्हाट्सएप करावे, जेणेकरून आम्हाला व्हेरिफाय करता येतील असे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून कळविण्यात आले आहे.
No comments