कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कृषी विभागाची कारवाई
सातारा 21 (जि.मा.का) सातारा जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्राची राज्य शासन कृषी विभाग मार्फत १३०० व कृषी विभाग अंतर्गत १४७४ असे एकुण २७७४ विक्री केंद्राची तपासणी केली .या तपासणीमध्ये युरिया खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे, खतांची जादा दराने विक्री करणे या सारख्या बाबी उघडकीस आल्या आहेत. तपासणीत दोषी आढळलेल्या १५ विक्री केंद्रावर परवाना निलंबनाची कारवाई त्यामध्ये बियाणे ४ खते ६ किटकनाशक ५ असे एकून १५ विक्री केंद्रांचे निलंबन केले आहे. तसेच ५ परवाना रद्दची कारवाई कृषी विभागाने केली आहे. या मध्ये सातारा तालुक्यातील २ आणि पाटण तालुक्यातील 3 निविष्ठा विक्री परवान्यांचा समावेश आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये,त्यांना खते आणि बियाणे योग्य किंमतीत मिळावीत यासाठी जिल्हयात कृषी विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी एकूण १२ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके खते, बियाणे व किटकनाशके दुकानांची अचानक तपासणी करत आहेत . तर प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या भरारी पथकामध्ये कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग, वजन मापे निरिक्षक यांचे प्रतिनिधी आहेत .
पंचायत समिती स्तरावर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निविष्ठाबाबत तक्रार असल्यास, ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. तसेच मोबाईल व्हॉटसॅप नंबर ९८२२६६४४५५ वर तक्रार नोंदवाव्यात.
No comments