पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे - पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 24 (जिमाका) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसई यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर खेख, उपवन संरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, फलटण व खंडाळ्याचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याची चांगली अंमलबजावणी करण्यात यावी. महिला वारकऱ्यांसाठी बंदीस्त स्नानगृहाची व्यवस्था असावी. ठरावीत अंतरावर आरोग्य पथक तैनाक असावे. त्याशिवाय फरते आरोग्य पथकही तैनात करण्यात यावे. पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालखी मार्गावर कायमस्वरुपी शौचालये व स्नानगृहे उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जागा निश्चित कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नियोजनाची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी यंदा 1 हजार 800 फरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 74 ठिकाणी तात्पुरती मुतारी, 24 ठिकाणी महिलांसाठी बंदीस्त स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे. सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत पाडेगाव येथे 17 शौचालये आणि 5 स्नानगृहे, व लोणंद येथील तळावर 39 शौचालये आणि 2 स्नानगृहे कायमस्वरुपी उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय हॉटेल, ढाबे, सार्वजनिक शौचालय युनिट, मंगल कार्यालय अशा एकूण 135 ठिकाणी 468 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 15 निवारा शेड उभारण्यात आली आहेत.
पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच तळावरील व विसाव्याच्या ठिकाणासह मार्गावरील सर्व पाण्याच्या स्त्रोतांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. पालखी मार्गावर एकूण 64 वैद्यकीय अधिकारी, 536 आरोग्य कर्मचारी, 39 रुग्णवाहिका, 17 आरोग्य दूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 21 वैद्यकीय पथकेही तैनात असणार आहेत. 1 हजार 40 आंतररुग्ण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 72 कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी 34 पथके तैनात असून टॅंकर भरण्याच्या ठिकाणी 48 पथके तैनात असतील. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक तपासणी करणे, खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शितपेय यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करणे, पालखी मार्गावर पालखी मार्गक्रमण कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतूक बंद ठेवणे असे आदेश देण्यात आले आहेत. तर लोणद मुक्कामी 5 गॅस एजन्सीमार्फत 7 हजार गॅस रिफील करण्याची व्यवस्था आणि तरडगाव, फलटण व बरड मुक्कामी 10 गॅस एजन्सीमार्फत 12 हजार गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी सांगितले.
No comments