Breaking News

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लावगड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    सातारा, दि. 12 :-    राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये जिल्हयात राबविणेत येत असुन योजनेतून जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

    या योजनेतंर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांचा स्वतःच्या नावे सात बारा असणे आवश्यक आहे. जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी समंतीपत्र आवश्यक राहील. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे समंतीपत्र आवश्यक राहील.

    या योजनेतून लाभ क्षेत्र मर्यादा किमान ०.२० हे. ते कमाल ६.०० हे. क्षेत्र इतकी आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार एका पेक्षा जास्त फळपिके लागवड करुन शकेल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन हेक्टर पर्यत लाभ घेतल्या नंतर उर्वरीत क्षेत्रांकरिता स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून कमाल क्षेत्र मर्यादपर्यंत लाभ घेता येईल. शेतकऱ्याने जमीन तयार करणे, माती व शेण खत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, आतंर मशागत करणे, काटेरी झांडाचे कुंपण करणे, ही कामे स्वखर्चाने करावयची आहेत. तर खड्डे खोदणे, कलमे/रापे लागवड करणे, रासायनिक व सेंद्रिय खते देणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे ही कामे १०० टक्के अनुदानित आहेत. अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणीकरण करुन सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. तथापि ही प्रक्रिया शेतकऱ्यांना एकदाच करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यानंतर (स्व.) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन याबाबीकरिता www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत. 

    महाडिबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमती, महिला व दिव्यांग यांची निवड लॉटरी पध्दतीने होईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी या कार्यालयास संपर्क साधावा.

No comments