आय. टी. आय. प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरु
सातारा दि. 03 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचेमार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रदेश प्रक्रिया दिनांक 3 जून 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जून, २०२४ पर्यंत आहे.
जिल्हयामधील ११ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये, विविध व्यवसायांच्या १४५ तुकडयांमध्ये एकूण ३०८८ जागा आणि ०८ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये, विविध व्यवसायांच्या २० तुकडयांमध्ये एकूण ६२० जागा अशा एकूण ३७०८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असणार आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका Online स्वरुपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेशप्रक्रियेचे विविध टप्पे इत्यादी प्रक्रियेबाबत समुपदेशन, सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दररोज आयोजित करण्यात येत आहे. सदर माहितीपुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्या संदर्भातील वेळापत्रक जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तसेच, यावर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करत आपला प्रवेश निश्चित करावा लागतो. त्यामुळे आता अर्ज भरताना, प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजिकच्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार हे सांगावे लागणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदवलेला मोबाईल क्रमांक आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करताना, हा मोबाईल क्रमांक लॉगीन असणार आहे. त्यामुळे हॉल टिकीट परीक्षा विषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणेसाठी हा मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जावर काळजीपूर्वक मोबाईल नंबर नमूद करावा.
तरी, जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी, वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन अथवा नजिकच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेशाबाबतची आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन सातारा जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केलेले आहे.
No comments