‘गांधी व्हर्सेस गब्बर’ पुस्तकातील व्यवस्थेवरील भाष्य वैशिष्ठ्यपूर्ण : किशोर बेडकिहाळ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - ‘‘1970 च्या दशकात व्यवस्थेला प्रश्न विचारणारे काही प्रायोगिक चित्रपट येवून गेले; मात्र ‘शोले’ हा चित्रपट रंजनात्मक आणि मसालेदार होता. ‘गांधी व्हर्सेस गब्बर’ या पुस्तकात ‘शोले’तील पात्र, परिसर, प्रसंग यावर भाष्य करुन ते आजच्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ललितस्वरुपातील लेखनाला बोधाची आणि व्यवस्थेवरील भाष्याची जोड दिलेली आहे. सिनेमापेक्षा व्यवस्थेवर जास्त भाष्य करणारे हे पुस्तक असल्याने ते वैशिष्ठ्यपूर्ण ठरते’’, असे विचार ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
9 सर्कल (साखरवाडी, ता.फलटण) येथील गोपाळ सरक लिखीत ‘गांधी व्हर्सेस गब्बर’ या पुस्तकाचे प्रकाशन येथील उपळेकर महाराज मंदिर सभागृहात किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ होते. यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ.नवराथ रासकर, चित्रपट दिग्दर्शक धोंडीबा कारंडे, ग्रामीण कथाकथनकार रविंद्र कोकरे, मैत्री पब्लिकेशनचे मोहिनी कारंडे, दयानंद कनकदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘‘गब्बर ही अन्याय, अत्याचार करणारी विकृती होती. त्याउलट वैरभाव निर्माण न होता अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करण्याचा संदेश देणारे गांधीजी होते. कोणत्याही सिनेमातील पात्र, भवताल, राजकीय, सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने पहावी हा संदेश देण्याचे काम गोपाळ सरक यांनी पुस्तकातून केले आहे. आपल्याकडील संचित इतरांसोबत वाटून घेत आपण आनंदात जगले पाहिजे; हे देखील गोपाळ सरक यांनी दाखवून दिले आहे’’, असेही किशोर बेडकिहाळ यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘गोपाळ सरक यांचे पुस्तक वाचत असताना त्यातील पात्र आपल्याशी संवाद साधतात. लेखकानं प्रत्येक पात्राच्या भूमिकेत जाऊन लिखाण केले आहे. राजकीय परिस्थितीचं मार्मिक वर्णन पुस्तकात आले असून असे लिखाण साहित्यिक प्रकर्षाने करु लागले तर राजकारण्यांना विचार करावा लागेल. आज ‘सत्या’ला किंमत आहे की ‘सत्ते’ला याचे चित्रण पुस्तकातून होत असून यातील प्रत्येक प्रकरणांवर चर्चासत्रे व्हावीत इतकी ती प्रभावी आहेत.’’
‘‘चित्रपटाचा आशय पाहण्याचे काम तत्त्वचिंतक, समीक्षक करत असतो. पुस्तकात नकारात्मक मूल्य आणि सकारात्मक मूल्य वेगळ्या पद्धतीने पुढे आणून नवा विचार मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. गोपाळ सरक यांच्या रुपाने फलटणला विद्वान विचारवंत आणि लेखक मिळतोय याचा आनंद आहे’’, असे डॉ.नवनाथ रासकर म्हणाले. मराठी चित्रपट दिग्दर्शक धोंडीबा कारंडे म्हणाले, ‘‘आजूबाजूच्या गोष्टींचं प्रतिबिंब सिनेमात उमटत असतं. मेंदू आणि हृदय बाजूला ठेवून चित्रपट पाहावा हा मतप्रवाह चुकीचा आहे. गोपाळ सरक यांच्याप्रमाणे लेखकांनी आपल्या लिखाणातून जनजागृती करावी.’’ प्रा.रवींद्र कोकरे म्हणाले, ‘‘वाचायला एकदा हातात घेतले की ते ठेवू वाटणार नाही असे हे दर्जेदार पुस्तक असून लेखकाने तत्त्व सांगण्याचा स्तुत्य प्रयत्न यातून केला आहे.’’
‘‘शोले चित्रपटात व्यापक समस्या दिसली आणि त्याची उत्तरे गांधी विचारात आहेत; ती आपण पुस्तकातून मांडली आहेत’’, असे सांगून गोपाळ सरक यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास सविस्तर उलगडला.
प्रास्ताविकात, ‘‘पुस्तकाच्या शिर्षकाची उकल वाचनानंतर होईल. कमी शब्दात मोठा आशय देण्याची कसरत लेखकाने केली असून हे पुस्तक म्हणजे सामूहीक प्रयत्नांचे यश आहे’’, असे दयानंद कनकदंडे यांनी सांगितले.
प्रारंभी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजू लोखंडे यांनी केले तर आभार प्रा.श्रेयस कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास साहित्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर, तत्त्वबोध विचार मंचचे सदस्य, तसेच साखरवाडी, फडतरवाडी, ढवळ, दुधेबावी, मिरगाव, फलटण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments