फलटण आगाराला १० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
फलटण दि. २८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) च्या स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत फलटण आगाराने पुणे प्रादेशिक विभागातील अ वर्गात प्रथम क्रमांकासह १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले असून या यशाबद्दल विविध स्तरावरुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आगार व्यवस्थापिका सौ. सोफिया मुल्ला यांनी स्थानिक पत्रकारांना आगार व्यवस्थापक कार्यालयात निमंत्रित करुन पुरस्कार व स्वच्छता अभियान यासंबंधी सविस्तर माहिती दिली, त्यावेळी तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक व सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक रोहित नाईक, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस. टी.)अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दि.१ मे २०२३ ते दि. ३० एप्रिल २०२४ या कालावधीत एस. टी. महामंडळाच्या सर्व बस स्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले, त्यामध्ये बस स्थानकावर दररोज येणाऱ्या व जाणाऱ्या बस फेऱ्यानुसार बस स्थानकांची 'अ' 'ब' आणि 'क' अशी वर्गवारी करण्यात आली होती, पुणे प्रादेशिक विभागातील म्हणजे पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ५ जिल्ह्यातील एकूण १३३ बस स्थानकापैकी ३४ बसस्थानके 'अ' वर्गात असून त्यामध्ये फलटण आगाराचा समावेश होता.
स्वच्छ सुंदर बस स्थानक योजनेंतर्गत निर्धारित कालावधीत दर ३ महिन्यांनी विविध क्षेत्रातील अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी अशा समितीने या बस स्थानकांना भेट देवून पाहणी करुन स्पर्धेतील निकषांनुसार मूल्यांकन व गुणदान केले आहे, सदर अभियानात दर ३ महिन्यांनी एक असे एकूण ४ सर्वेक्षण फेऱ्याद्वारे फलटण बस स्थानकाचे मूल्यांकन करण्यात आले, त्यामध्ये स्थानकाची स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रवासी वाढीसाठी केलेले सकारात्मक प्रयत्न, राज्य परिवहन गणवेशातील सर्व अधिकारी - कर्मचारी, स्वच्छ सुलभ शौचालय, प्रवाशांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त नियोजन, स्वच्छ बसेस, योग्य वेळेत बसेसची वारंवारीता, अवैध प्रवाशी वाहतुकीला आळा घालून राज्य परीवहन प्रवासी उत्पन्न वाढविणे, प्रवाशी व कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येक महिन्यात नामांकित डॉक्टरांमार्फत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांचे आयोजन याची पाहणी करुन गुणदान करण्यात आले. त्यामध्ये फलटण आगराने ७५ गुण मिळविले आहेत.
ही सर्व आव्हाने पार करत, प्रवाशांना दर्जेदार सुविधा, बस स्थानकाची स्वच्छता यासाठी फलटण आगारातील अधिकारी, कर्मचारी, प्रवासी संघटना आणि प्रवासी यांनी एकत्र येऊन सर्व निकष नियमांसाठी तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक व यंत्रशाळा अधिक्षक रोहित नाईक यांच्या नेतृत्वाखाली अगदी स्वतः झाडू हातात घेऊन सामुदायिक स्वच्छतेत सहभाग घेतल्याने सर्वांच्या एकजुटीतून हा महत्वाचा व सन्मानाचा पुरस्कार फलटण आगाराने पटकावला आहे.
तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, नूतन आगार व्यवस्थापिका सौ. सोफिया मुल्ला यांनी सदर अभियानात मोलाची कामगिरी करणारे फलटण आगारातील पर्यवेक्षक, सर्व चालक - वाहक, कार्यशाळा कर्मचारी, सफाईगार, स्वच्छक, प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी आणि प्रवासी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व भविष्यातही फलटण आगार प्रवाशांना दर्जेदार सोयी सुविधा पुरवेल व कायम अव्वल स्थानावर राहील याची ग्वाही दिली आहे.
आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनत्मक सांघिक कामगिरी मुळेच हे ध्येय साध्य करण्यात यश प्राप्त झाले असून याचे सर्व श्रेय फलटण आगारातील सर्व कर्मचारी बंधू - भगिनींना जात असल्याचे आगार व्यवस्थापिका सौ. सोफिया मुल्ला यांनी आवर्जून सांगितले.
No comments