एटीएममधून स्टेटमेंट काढून देताना वृद्धाची फसवणूक ; ५१ हजार रुपयांना घातला गंडा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - दि.२३ - लक्ष्मी नगर फलटण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर वृद्धाची फसवणूक झाली आहे. वृद्धास एटीएम मशीन मधून मिनी स्टेटमेंट काढण्यास मदत करणाऱ्या युवकाने, वृद्धाचे एटीएम कार्ड लंपास करून, कार्डच्या माध्यमातून ५१ हजार ८०० रुपये काढून वृद्धाची फसवणूक केली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,
दि.20/06/2024 रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर, लक्ष्मीनगर, फलटण येथे, हणमंत खंडु सावंत, वय ६१ वर्षे, रा.खामकरवाडी, पिंपोडे खुर्ड, ता.कोरेगाव, जि.सातारा हे पैसे काढत होते. सावंत यांनी त्यांच्या एटीएम कार्ड वरून २ हजार रूपये काढले व त्यांना मिनीस्टेटमेंन्ट काढता न आल्याने, तेथेच त्यांच्या पाठीमागे उभा असलेला अनोळखी इसम (वय अंदाजे ३० वर्षे) सावंत यांना मिनीस्टेटमेंन्ट काढुन देतो असे म्हणाला. त्यावेळी सावंत यांनी त्याच्याकडे एटीएम पिन नंबर सांगुन त्याला विश्वासाने कार्ड दिले. त्यानंतर सदर इसमाने सावंत यांना मिनीस्टेटमेंन्ट काढुन दिले.व तो सावंत यांना त्यांचे कार्ड न देता दुसरेच एटीएम कार्ड देऊन निघून गेला. त्यानंतर सावंत यांच्या एटीएम कार्ड मधुन सातारा व कराड येथुन एकुण ५१८००/-रूपये काढुन फसवणुक केली आहे. अधिक तपास एएसआय भोसले हे करीत आहेत.
No comments