माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही ; आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा
फलटण (फलटण गंधवार्ता) - माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्यामुळेच आपला पराभव झाला असे मत सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. भाजप विरोधी काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी लिखित स्वरूपात केली.
सातारा येथे भाजप जिल्हा पदाधिकारी यांची बैठक पश्चिम संघटन महामंत्री मकरंदभाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मा.आमदार मदनदादा भोसले , युवा नेते मनोज घोरपडे संघटनेचे सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा अहवाल फलटण येथील शिष्टमंडळाने दिला व निलंबनाची मागणी केली. यावेळी पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल ससते शहराध्यक्ष अनुप शहा , ज्येष्ठ नेते विश्वासराव भोसले गट नेते अशोकराव जाधव, मा. नगरसेवक सचिन अहिवळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार शिंदे म्हणाले की, लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, त्याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपले आभारी आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये खूप चांगले काम केले, कोरोनाचा काळ, विरोधी सरकार यामुळे रखडलेले सर्व प्रश्न आपल्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले. भाजप संघटनेमध्ये खासदारांनी वेळ देऊन, संघटनेलाही बळ देण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वच अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. व्यक्तिगत संवाद थोड्याफार प्रमाणात कमी पडला. परंतु त्यांनी केलेलं काम हे मतदार संघातील जनता विसरणार नाही. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आपल्याच पक्षामध्ये राहून, ज्यांना भाजपने म्हणजे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना आमदार केलं, त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला मदत केली, त्यांनी घरातील उमेदवारामुळे पक्षाचे काम केले नाही. त्यांनी घराला प्राधान्य दिले. पक्षहीत महत्त्वाचे मानले नाही. त्यांनी उघडपणे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला, त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यावर पक्षशिस्तीची कारवाई करावी व त्यांची आमदारकी रद्द करावी. अन्यथा सर्वसामान्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल. भविष्यात कोणीही काही करेल याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील भाजपला आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेवर होईल. त्यामुळे तातडीने निलंबन करावे ही विनंती.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट, माढा मतदारसंघातील महायुतीचे घटक पक्षातील राष्ट्रवादीने संपूर्ण मतदारसंघांमध्ये विरोधात काम केले आहे. तुतारी बरोबर करमाळा, माढा, सांगोला या ठिकाणचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी उघडपणे भविष्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तडजोडी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळण्या ऐवजी तुतारीला लीड मिळाले आहे. कारण सांगत असताना शरद पवार यांच्या बद्दल सहानुभूती व मराठा आंदोलन यावर खापर फोडले जात आहे. प्रत्यक्षात त्यांचे कार्यकर्ते विरोधात काम करत होते.
फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीव राजे निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे जाहीररित्या सभा घेऊन, महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यास फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पासून ते आमदारकी पर्यंत सर्व निवडणूक जिंकेल या दृष्टीने विचार करून, आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कशा पद्धतीने होईल हे पहावे व त्यांच्या कार्यकर्त्यांना महामंडळ शासकीय कमिटी वर कोठेही त्यांची वर्णी लागू नये याची दखल घेतली जावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खूप काहीतरी सहन करावे लागेल याचाही विचार व्हावा ही विनंती.
No comments