प्रवाशांशी जपलेले आपुलकीचे नाते आणि कर्तव्य भावनेने केलेल्या उत्तम कामामुळे फलटण आगार आघाडीवर - अरविंद मेहता
अरविंद मेहता, प्रा. शिवलाल गावडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, ज्येष्ठ नागरिक वगैरे केक कापताना |
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ६ -फलटण आगारातील चालक, वाहक, कार्यशाळा यांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी जपलेले आपुलकीचे नाते आणि कर्तव्य भावनेने केलेले उत्तम काम यामुळेच फलटण आगार अनंत अडचणीवर मात करुन उत्पन्नात सतत आघाडीवर असल्याचे नमूद करीत अरविंद मेहता यांनी आगार स्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण एस. टी. बस स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून अरविंद मेहता बोलत होते, यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवलाल गावडे, साहित्यिक तानाजी जगताप, प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्योतिबा मार्गावर जाण्यासाठी खास सजविलेल्या एस. टी. बस समवेत अरविंद मेहता, प्रा. शिवलाल गावडे, रोहित नाईक, राहुल वाघमोडे, सुहास कोरडे, धीरज अहिवळे, तानाजी जगताप वगैरे. |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) गेल्या ७६ वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी हे आपले ब्रीद वाक्य यशस्वीपणे सांभाळण्यात किंबहुना प्रवाशांना सतत समाधानकारक सेवा देण्यात यशस्वी झाल्याचे नमूद करताना अलीकडे शासन, प्रशासन यांचे या लोकसेवेची भावना जपणाऱ्या महामंडळाकडे दुर्लक्ष झाल्याने आणि महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या अपेक्षा, मागण्या, समस्या याकडे डोळे झाक केल्याने प्रवाशांनी एस. टी. कडे पाठ फिरवून खाजगी प्रवासी वाहतुकीला प्राधान्य दिल्याने महामंडळाचे उत्पन्न घटले, परिणामी अडचणी सतत वाढत राहिल्या तरीही फलटण आगार आजही उत्पन्नात प्रवाशी व कर्मचाऱ्यांच्या अतूट नात्यामुळे आपली आघाडी कायम राखण्यात यशस्वी झाल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
११० बसेस, पुरेसे चालक वाहक, कार्यशाळा यांत्रिक कर्मचारी, आवश्यक टायर्स, सुटे भाग आणि विभाग स्तरीय अधिकाऱ्यांचे लक्ष, फलटण आगारातील चालक वाहक हे स्थानिक असल्याने त्यांनी प्रवाशांशी जपलेले अतूट नाते यामुळे फलटण आगार सर्व आघाड्यांवर नेहमी यशस्वी होत गेले, आज या आगारात केवळ ७०/८० बसेस असून त्यापैकी बहुसंख्य वापरायोग्य नसल्याचे सांगताना १० लाख कि. मी. किंवा १० वर्षानंतर बस वापरात न ठेवण्याचा एस. टी. चा नियम आहे, फलटण आगारात बहुसंख्य बसेस १२ ते १५ लाख काही १८/२० लाख कि. मी. पर्यंत वापरलेल्या असल्याने, कार्यशाळेत पुरेसे सुटे भाग नाहीत, पुरेसे कर्मचारी नाहीत तरीही फलटण आगार सुरु आहे पण त्याबाबत कोणीच समाधानी नसल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
दि. १ जून १९४८ रोजी पुणे ते नगर मार्गावर पहिली एस. टी. बस धावल्याचे निदर्शनास आणून देत त्यामुळे दि. १ जून रोजी एस. टी. चा वर्धापन दिन प्रतिवर्षी साजरा केला जातो, एस. टी. ने उत्पन्नापेक्षा प्रवासी सेवेला नेहमीच प्राधान्य दिले असल्याने लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अपंग, रुग्ण, समाजसेवक, पत्रकार वगैरे विविध समाज घटकांसाठी अनेक योजनांद्वारे प्रवास भाड्यात सवलत, बस मध्ये प्राधान्याने प्रवेश या बाबी उपलब्ध करुन दिल्या असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
अनंत अडचणी असल्या तरी त्यावर मात करुन प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न लक्षात घेऊन प्रवाशांनी महामंडळाला बळ दिले पाहिजे तरच सेवा अधिक दर्जेदार होईल असा विश्वास प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी व्यक्त केला.
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवलाल गावडे, साहित्यिक तानाजी जगताप यांची समयोचीत भाषणे झाली.
या कार्यक्रमातच नुकतेच सेवानिवृत्त झालेले चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक यांचा सपत्नीक यथोचित सत्कार आगारस्तरीय उत्सव समिती व प्रवाशी संघटनेच्यावतीने फेटे बांधून व भेट वस्तू, सन्मानचिन्ह देवून करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त वृध्द, महिला, अपंग प्रवाशांच्या हस्ते केक कापून, सर्व प्रवाशांना साखर पेढे आणि गुलाब पुष्प देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर तथा माऊली कदम यांनी सूत्र संचालन केले.
No comments