बेघरांना घरकुलासाठी भूखंड देण्यात फलटणची आघाडी : प्रांताधिकारी, तहसीलदार यांचा सन्मान
फलटण दि. २८ : बेघर कुटुंबांना शासकीय योजनेतून स्वतःचे घरकुल उभारण्यासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्यात पुणे महसूल विभागात फलटण तालुक्यात उत्तम काम झाल्याने द्वितीय क्रमांक आलेल्या फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून स्वतःची जागा असणाऱ्या बेघर कुटुंबांना घरकुले उभारण्यासाठी निधी दिला जातो, तथापि ज्यांना स्वतःची जागा नसेल त्यांना त्यासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याची योजना असून त्यामध्ये फलटण तालुक्यात महसूल विभागाने विशेष लक्ष घालुन ४३ कुटुंबांना शासकीय भूखंड उपलब्ध करुन दिले आहेत.
फलटण तालुक्यात गेल्या २२/२३ वर्षांपासून स्वतःची जागा नसल्याने ही कुटुंबे घरकुलापासून वंचित राहिली होती, प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी ठोस भूमिका घेऊन ही सर्व प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावल्याने त्यांचा जिल्हास्तरावर पुणे विभागात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
फलटण तालुक्यात एकूण ४३ लाभार्थींना घरकुलासाठी शासकिय भूखंड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, त्यामध्ये हणमंतवाडी ११, राजुरी ११, पिंप्रद ५, ढवळ ५, जिंती ११ असे लाभार्थी आहेत. त्यापैकी १३ घरकुले पूर्ण, १० प्रगतीपथावर, ७ लाभार्थींनी बांधकामे सुरु केली नाहीत तर ६ लाभार्थी इच्छुक नसल्याने त्यांचे भूखंड रद्द करण्यात येत आहेत आणि अद्याप ७ लाभार्थी प्रतिक्षा यादीवर असून त्यांना भूखंड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
No comments