पालखी सोहळ्यात आवश्यक सेवांसह आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे - प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम फलटण तालुक्यात आहेत. यादरम्यान वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच आरोग्य सुविधा उपलब्ध करून ॲम्बुलन्स, रिझर्व बेड आरक्षित करावेत तसेच पालखी महामार्गावरील अपूर्ण पुलांचे काम पूर्ण करावे, सर्विस रोड तयार करावेत अशा सूचना संबंधितांना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, महावितरण, पंचायत समिती, परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य व जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाला, पालखी सोहळा कालावधीत शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध असावा, खाजगी ॲम्बुलन्स तसेच शासकीय ॲम्बुलन्स आरक्षित करून ठेवाव्यात तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये देखील बेड आरक्षित करून ठेवावे, ब्लड उपलब्ध ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना पालखी महामार्ग वरील अपूर्ण पूलांचे, रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन जिथे रस्त्याचे काम सुरू आहे तिथे सर्विस रोड करण्याच्या सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.
महावितरण विभागास ट्रान्सफॉर्मर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच पालखीतळावर विद्युत तारा व पोल उपलब्ध करून ठिकठिकाणी विद्युत कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सांगितले. फिडिंग पॉईंटला वीज सप्लाय उपलब्ध करून द्यावा तसेच या कालावधीत भारतीय सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.
पिण्याच्या पाण्यासाठी ४२ फीडिंग पॉईंट उपलब्ध करण्यात येणार असून, १५०० टॉयलेट उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रवासी वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या सूचना देतानाच अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने अन्नपदार्थांच्या अचानक तपासण्या करण्यात याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.
No comments