विधीमंडळ अधिवेशनात संपादक व पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु : आ.दीपक चव्हाण
वार्षिक सभेदरम्यान आ.दीपक चव्हाण यांचे स्वागत करताना रविंद्र बेडकिहाळ. सोबत विनोद कुलकर्णी, बापुराव जगताप, बाळासाहेब आंबेकर, जयपाल पाटील. |
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ -‘आज प्रसारमाध्यमांमध्ये नव्याने कितीही आधुनिक प्रकार आले तरी वृत्तपत्रे हीच पत्रकारितेचा पाया असल्याने त्यांची विश्वासार्हता सर्वाधिक आहे. वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार व ज्येष्ठ सेवानिवृत्त पत्रकार यांचे प्रश्न गंभीर असून विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्यात समन्वय साधून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात हे प्रश्न सोडवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करु’’, असे अभिवचन फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्रातील वृत्तपत्र संपादकांची शासनमान्य संघटना ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ’ या राज्यस्तरीय संस्थेची 44 वी तर ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या संस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेनंतर उपस्थित संपादक व पत्रकारांशी संवाद साधताना आ.दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, संपादक संघाचे तज्ज्ञ संचालक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांनी केलेल्या मागण्यांचे निवेदन विधीमंडळाच्या गत अधिवेशनादरम्यान आपण ना.अजितदादा पवार यांना दिले होते. आता येत्या अधिवेशनातही पत्रकार व संपादकांचे प्रश्न लक्षवेधीद्वारे विधीमंडळासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्यात या प्रश्नांबाबत समन्वय साधून या संस्थांच्या शिष्टमंडळाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसमवेत बैठकीचे आयोजन करण्याचाही आपण प्रयत्न करु’’, असेही आ.दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
‘वृत्तपत्रांची जाहिरात दरवाढ, पडताळणीतील जाचक अटी, पत्रकारांना देण्यात येणार्या तुटपुंज्या सुविधा, अधिस्वीकृती पत्रिकेबाबतचे नियम, ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्माननिधीतील क्लिष्ट अटी, सन्माननिधी वाढीबाबतची प्रलंबित अंमलबजावणी अशा विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी संस्था प्रयत्नशील असून त्यासाठी ना.अजितदादा पवार, आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. छ. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आ.दीपक चव्हाण यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असते. येत्या अधिवेशनात या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे आवर्जून लक्ष वेधावे’’, अशी मागणी रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी केली.
‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आपण करु. त्यासाठी संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी योग्य उपाययोजना राबवू. पत्रकारांच्यात एकी होत नसल्याने त्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असते. रविंद्र बेडकिहाळ यांचे पत्रकारांच्या कल्याणासाठी मोठे काम असून भविष्यात एकजुटीने आपण त्यांच्या पाठीशी राहून पत्रकार, संपादक यांचे प्रश्न मार्गी लावून घेवूयात’’, असे विनोद कुलकर्णी म्हणाले.
यावेळी संपादक संघाचे ज्येष्ठ संचालक रमेश खोत (जालना), बाळासाहेब आंबेकर (सातारा), माधवराव पवार (नांदेड), जयपाल पाटील (अलिबाग), बापुराव जगताप, सौ.अलका बेडकिहाळ, अॅड.रोहित अहिवळे, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे, सदस्य उमेश गुप्ता (अंबेजोगाई), कार्यलक्षी संचालक अमर शेंडे, पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त सुहास रत्नपारखी, गजानन पारखे (पुणे), फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, पत्रकार यशवंत खलाटे - पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेवून पत्रकार व संपादकांचे प्रश्न अधोरेखीत केले.
प्रारंभी रविंद्र बेडकिहाळ यांनी आ.दीपक चव्हाण यांचे स्वागत केले. त्यानंतर विशेष योगदानाबद्दल विनोद कुलकर्णी, बाळासाहेब आंबेकर, जयपाल पाटील, अॅड.रोहित अहिवळे, यशवंत खलाटे - पाटील यांचा आ.दीपक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमर शेंडे यांनी केले.
No comments