फलटण तालुका सह. दूध संघाच्या जमीन विक्री विरोधात आंदोलन ; दूध संघ चालवता येत नसेल तर राजीनामे द्यावे आम्ही दूध संघ कर्जमुक्त करतो - रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - फलटण तालुका सहकारी दूध संघ राजे गटाकडे येण्याअगोदर, तिथे ८० हजार ते १ लाख लिटर दूध संकलन चालू होते मात्र असे असतानाही तालुका दूध संघ राजेगटाने मोडीत काढला व खाजगी संस्था वाढवली. तसेच श्रीराम सहकारी कारखान्याची जमीन विकली, मालोजी बँक बुलडाणा बँकेस चालवण्यास दिली आणि आता फलटण तालुका सहकारी दूध संघाची जमीन विक्रीस काढली आहे. फलटण शहरातील ज्या जागेवर रिझर्वेशन होतं त्या जमिनी विकलेल्या आहेत, एवढेच नाही तर पालखीतळ असणारे विमानतळ देखील विक्रीस काढलेले आहे, हे विमानतळ जमिनीचा विक्री प्रस्ताव अजित पवार यांच्या मार्फत शासनाकडे दिला आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो, हा दूध संघ शेतकऱ्याच्या मालकीचा सहकारी दूध संघ आहे, आणि याची विक्री थांबवावी असे आवाहन करतानाच, तुम्हाला जर दूध संघ चालवता येत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या, आम्ही दूध संघ चालवायला घेऊन, दूध संघ कर्जमुक्त करू असे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाच्या जमीन विक्री विरोधात केलेल्या आंदोलनाप्रसंगी रणजितसिंह बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, चेतन सुभाषराव शिंदे, रणजितसिंह भोसले, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, नंदकुमार मोरे, राजेंद्र काकडे, प्रदीप झनझणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रणजीतसिंह म्हणाले की, कै. सुभाषराव शिंदे यांच्याकडून फलटण तालुका दूध संघ काढून घेतला, कै. हणमंतराव पवार यांच्याकडून श्रीराम कारखाना काढून घेतला तसेच न्यू फलटण शुगर कारखाना प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्याकडून काढून घेतला व दुसऱ्याला चालवायला दिला. मालोजी बँक विकली, श्रीराम कारखान्याची जमिन विकली, आता दूध संघाची जमिन विकायला काढली आहे, फलटण मध्ये या सर्वांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतानाच दूध संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा दूध संघ आहे, त्याची विक्री ताबडतोब थांबवावी, दूध संघावर जर अडीच कोटी रुपये कर्ज असेल तर तुम्ही दूध संघातून पायउतार व्हा, राजीनामे द्यावे आम्ही अडीच कोटी रुपये भरू, दूध संघ चालवायला घेऊन तो चालवून, फलटण तालुक्याची अस्मिता असणारा हा दूध संघ पुन्हा एकदा सुरू करू असे रणजीतसिंह यांनी जाहीर केले.
फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुंडशाही बोकाळत आहे आणि पोलीस स्टेशनवर दबाव आणण्याचा कार्यक्रम सुरू आहे, पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचे काम चालू आहे. फलटणमधील दोन नंबर व्यावसायिक हे या सत्ताधाऱ्यांचे पार्टनर आहेत, आणि अशा लोकांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर आरोप करणे हे निंदनीय आहे. जे अपराध करतात त्यांना पोलिसांमार्फत शासन व्हायला लागले मात्र हे सर्व लोक सत्ताधाऱ्यांशी संबंधित असल्यामुळे पोलीस स्टेशनवर दबाव आणला जातोय त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो असे रणजितसिंह नाईक निंबाळकर निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना चेतन सुभाषराव शिंदे म्हणाले की, आम्ही या आंदोलनामध्ये सर्वांच्या बरोबर असून, दूध संघाची जमीन विक्री केली तर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी चेअरमन जबाबदार राहतील.
No comments