माजी खासदारांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व बेछूट ; तुम्हाला स्वराज चालवता आला नाही अन तुम्ही दूध संघ चालवण्याच्या भाषा करताय - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
तुम्हाला जनतेने पायउतार केले आहे - रामराजे नाईक निंबाळकर
लोकसभा निवडणुकीत माजी खासदारांना फलटण तालुक्यातून १८ हजार मतांचे लीड कसे मिळाले ते सर्वांना माहीत आहे. मात्र माढा तालुका व करमाळा तालुका येथे ४१ हजार व ५१ हजार मतांचे लीड उलट माजी खासदारांवर पडलं, हे कसं ? तुम्हाला लोकांनी पायउतार केलेला आहे आणि ते तुमच्या डोक्यातून जात नाही. तसेच प्रल्हादराव पाटील हे देखील स्वतःला अद्याप साखरवाडी कारखान्याचे चेअरमन समजतात असा टोला विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे एक निंबाळकर यांनी पत्रकारांसमोर मारला.
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन, शासकीय परवानगी घेऊन, दूध संघाची काही जमीन विक्री करण्याकरता काढली आहे, पूर्ण दूध संघ विक्रीसाठी काढलेला नाही हे स्पष्ट करून, हा दूध संघ सहकारी तत्त्वावर आहे आणि तो सहकारी तत्वावरच जिवंत ठेवू अशी ग्वाही देऊन, तज्ञ लोकांच्या मदतीने बँक चालवणे याचा अर्थ बँक विकली असा होत नाही, सध्या मालोजीराजे सहकारी बँक सुस्थितीत चालू असल्याचे सांगून, श्रीराम सहकारी साखर कारखाना पूर्णपणे बंद झाल्यानंतर, राजेगटाने ताब्यात घेतला, श्रीमंत मालोजीराजे व शिवाजीराजे यांनी काढलेला हा कारखाना सहकारी आहे आणि तो सहकारीच राहणार, त्या दृष्टिकोनातून राजेगटाने प्रयत्न करून, बंद असणारा कारखाना सुस्थितीत आणला असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले. माजी खासदार बिनबुडाचे व बेछूट आरोप करत आहेत, तुम्हाला स्वराज दुधसंघ चालवता आला नाही आणि तुम्ही कुठे फलटण तालुका दूध संघ चालवण्याची भाषा करताय, तुम्ही स्वतः स्वराज दूधसंघ, कुटे डेअरीला विकला आणि त्याला अडचणीत आणले, तुम्हाला कोणतीही एक संस्था चालवता आली नाही आणि तुम्ही कशाला विकत घेण्याची भाषा करताय अशी खरमरीत टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाची जमीन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना त्याबाबत निवेदन दिले, यावेळी बोलताना केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी लक्ष्मी विलास पॅलेस, फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, संजय गांधी निराधार व अनुदान योजना समिती अध्यक्ष बापूराव गावडे, संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले उपस्थित होते.
काय आहे? फलटण तालुका दूध संघाच्या जमीन विक्री पाठीमागचे सत्य
काही ठराविक लोकांनी माजी खासदारांच्या माध्यमातून एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये दूध संघ जमीन विक्रीचा प्रश्न उपस्थित केला, वास्तविक या मोर्चामध्ये दूध संघाच्या संबंधित असणारा एकही सभासद नव्हता, कुठलीही सहकारी संस्था असते, ती त्या सभासदाची असते, हे माझे खासदारांना माहीत नसावं, आणि ते सभासद त्या संस्थेबद्दलचा कुठलाही निर्णय घेत असतात, जनरल बॉडी, संचालक मंडळाच्या बैठकीत या समितीचे निर्णय होत असतात आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय व शासकीय परवानगी घेऊन दूध संघाची काही जमीन विक्री करण्याकरता काढली आहे, पूर्ण दूध संघ विक्रीसाठी काढलेला नाही आणि हा दूध संघ सहकारी तत्त्वावर आहे आणि तो जिवंत ठेवावा यासाठी राजे गटाने नेहमीच प्रयत्न केला आहे, सहकारी संस्था, काही झाले तरी जिवंत राहिली पाहिजे, हे धोरण राजे गटाचे आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर अवघ्या तीन सहकारी तत्त्वावर चालणारे दूध संघ सध्या चालू आहेत, बाकी सर्व अवसानयात निघाले आहेत, मात्र आपण फलटण तालुका दूध संघ जिवंत ठेवलेला आहे आणि जिवंतच ठेवू अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
बंद पडलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना आज सुस्थितीत
मोर्चामध्ये माजी खासदारांनी जे जे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत, आम्ही कधी चालू असलेली सहकारी संस्था ताब्यात घेतली नाही, श्रीराम सहकारी साखर कारखाना पूर्णपणे बंद झाल्यानंतर, तो चालत नाही म्हणून, त्यावेळी कोणतीही निवडणूक न होता आमच्या ताब्यात आला. त्यावेळी कै. हणमंतराव पवार हयात नव्हते. हा बंद असलेला कारखाना ताब्यात घेऊन, रामराजे यांच्या प्रयत्नातून, शरद पवार, जवाहर व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या माध्यमातून हा कारखाना आज पूर्णपणे कर्जमुक्त केला, यामागे उद्देश एकच होता की, या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, कामगारांना वेळेवर पगार मिळावा आणि सहकारी तत्त्वावर असणारी ही संस्था सहकारीच राहावी. एवढाच त्या ठिकाणी विचार होता. आम्हालाही त्यावेळी अनेक जणांनी, अनेक सल्ले दिले. कारखाना दिवाळखोरीत काढा व त्यानंतर लिलाव करून तो स्वतः विकत घ्या, व खाजगी स्वरूपात चालवा अशा प्रकारचा देखील सल्ला दिला, परंतु रामराजे यांनी तो सल्ला डावलला व स्पष्टपणे सांगितले की, श्रीमंत मालोजीराजे व शिवाजीराजे यांनी काढलेला कारखाना आहे. हा सहकारी आहे, तो सहकारीच राहणार, तो खाजगी होणार नाही आणि काही झालं तरी तो सहकारी म्हणूनच आपण चालवायचा आहे, त्यानंतर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले, सुदैवाने या प्रयत्नांना यश आले व बंद असणारा कारखाना आपण सुस्थितीत आणला असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
साखरवाडी साखर कारखान्याचे सर आरोप निराधार
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर कारखाना देखील बंद पडला होता शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकीत होते, कामगारांचा पगार थकीत होता, प्रॉव्हिडंट फंडची रक्कम अद्यापही थकीत आहे अशा अत्यंत वाईट परिस्थितीत असलेला कारखाना श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नातून दत्त इंडियाच्या माध्यमातून सुरू केला. आज त्या भागाततील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जातोय, कामगारांना वेळेवर पगार मिळतोय हे विरोधकांना पाहवत नसेल त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखत आहे.
साखरवाडी साखर कारखान्याबाबत होत असलेले आरोप असेच निराधार, निरर्थक असल्याचे सांगताना प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी या कारखाण्यात स्वतःचे किती पैसे घातले असा सवाल करीत ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी वगैरे सर्व घटकांचे पैसे न देता साखर कारखाना कसा चालेल, तो प्रशासनाने अवसायानात काढला आणि त्याची विक्री होत असताना साखरवाडीवर पुन्हा नवे संकट नको म्हणून आ. श्रीमंत रामराजे यांनी दत्त शुगर लि., ला पाठिंबा दिला, मागील देणी द्यायला लावली, आणि आता कारखाना, अर्कशाळा, इथेनॉल, वीज निर्मिती, बारदान उत्पादन तेथे व्यवस्थित सुरु असल्याने सर्वच घटकांना दिलासा मिळाला, बाजार पेठ पुन्हा उभी राहिली हे महत्वाचे असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक सुस्थितीत चालू
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँके संदर्भात माजी खासदारांनी केलेल्या आरोपाचे खंडन करताना, श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, कोणतीही बँक अशी विकली जात नाही, मालोजीराजे बँकेचा मी चेअरमन आहे, तज्ञ लोकांच्या मदतीने आपण ही बँक चालवतोय, याचा अर्थ, आपण ही बँक विकली असा होत नाही, रिझर्व बँकेच्या नियमानुसार मालोजीराजे बँक सुस्थितीत चालू असून, आज बँक फायद्यामध्ये आहे. माजी खासदार बिनबुडाचे व बेछूट आरोप करत आहेत, तुम्हाला स्वराज दुधसंघ चालवता आला नाही आणि तुम्ही कुठे फलटण तालुका दूध संघ चालवण्याची भाषा करताय, तुम्ही स्वतः स्वराज दूधसंघ, कुटे डेअरीला विकला आणि त्याला अडचणीत आणले, तुम्हाला कोणतीही एक संस्था चालवता आली नाही आणि तुम्ही कशाला विकत घेण्याची भाषा करताय असा सवाल श्रीमंत संजीवराजे यांनी केला.
फलटण तालुक्यातील सहकारी संस्था राजे गटाने मोडीत काढल्याचा आरोप निराधार व राजकीय हेतूने केल्याचे निदर्शनास आणून देत तालुक्यातील बंद पडलेल्या सहकारी संस्था आम्ही तेथील सभासद, कामगार आणि तालुक्याचे हित लक्षात घेऊन पुन्हा उभ्या केल्याचे सांगताना त्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण दूध संघ वगैरे अनेक संस्था आहेत, याउलट यांनी एक ही सहकारी संस्था उभी केली नाही, शेतकरी, कामगार वगैरे घटकांचे हित जपले नाही ते आम्ही सहकार मोडल्याची भाषा करतात, यांनी खाजगी दूध संस्था उभी केली ती विकून टाकली, साखर कारखाना खाजगी तत्त्वावर उभा केला त्याबाबत ऊस उत्पादक, कामगार समाधानी नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कमिन्स समोरील सहकारी कुक्कुटपालन संस्थेची जमीन खाजगी कशी झाली?
विमानतळ, गोळीबार मैदान, नारळी बाग या जमीन विक्रीच्या आरोपांबाबत बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, विमान तळ जागेची मागणी कोणी केली होती याबाबत कागद पत्रे दाखवीत माहिती घ्या असे सांगतानाच फलटण तालुका क्रीडा संकुल, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, आय टी आय यासाठी आम्ही आमची २५ एकर जमीन मोफत दिली आहे, यांचे योगदान काय ? चेतन शिंदे मोर्च्यात असल्याचे निदर्शनास आणून देत, कमिन्स समोरच्या सहकारी कुक्कुट पालन संस्थेची जमीन खाजगी कशी झाली असा सवालही श्रीमंत संजीवराजे यांनी उपस्थित केला.
३० वर्षात कधीही गुन्हेगार व २ नंबर व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले नाही
जुगार, मटका, चक्री व्यवसायिकांबरोबर राजे गटाचे संबंध असल्याच्या आरोपाचे खंडन करत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, जुगार, मटका, चक्री, गुन्हगार यांना कधीही आम्ही थारा दिला नाही, ३० वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत, परंतु आम्ही ३० वर्षात कधीही अशा व्यवसायिकांना, गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले नाही. मात्र ही सर्व मंडळी कोणासमवेत असतात हे सर्वश्रुत आहे, या लोकांच्या संरक्षणासाठी पोलिसाना रात्री अपरात्री घरी बोलावून खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम कोणी केले याचीही माहिती सर्वांना असल्याने त्याबाबत आम्ही काही सांगण्याची आवश्यकता आहे असे वाटत नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
No comments