फलटण येथे बेफाम दुचाकी चालकाकडून पादचारी व दुचाकीस धडक ; १ ठार २ जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - फलटण विंचुर्णी रस्त्यावर गिरवी नाका परिसरात, बेफाम दुचाकी चालकाने पादचाऱ्यास पाठीमागून धडक दिली तर पुढून येणाऱ्या एका महिला दुचाकी स्वारास समोरून धडक दिली. या अपघातामध्ये पादचारी वृध्द ठार झाला असून, महिला वकील व स्वतः दुचाकी चालक देखील जखमी झाला आहे.
अमोल संतोष रणवरे वय २३ वर्षे राहणार जिंती ( विकास नगर फलटण),ता. फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयताचे नाव असून, नवीन कायदा भारतीय न्याय संहिता कलम 106(1),281,125(A),427 व मोटार वाहन कायदा कलम 134(A),134(B),184 प्रमाणे त्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेले माहितीनुसार, दिनांक १/७/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान गिरवी नाक्याजवळ फलटण - विंचुर्णी रोडवर, फलटण येथे अमोल संतोष रणवरे हा दुचाकीवरून विंचुर्णी रस्त्याने फलटण बाजूकडे येत असताना हयगयीने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेफाम गाडी चालवत, अनिरुद्ध जगन्नाथ देवसकर वय ६५ वर्ष, राहणार जुनी मंडई कसबा पेठ फलटण यांना पाठीमागून धडक देऊन त्यांच्या मरणास कारणीभूत झाला, तसेच ॲड.मयूरा मुकुंद देशपांडे यांच्या प्लेजर गाडी क्रमांक एम एच ११ ए एन ६९६८ हीस समोरून धडक देऊन त्यांच्या गंभीर दुखापतीस तसेच स्वतःचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दातीर हे करीत आहेत.
No comments