ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबविण्यास मान्यता ; शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 14 – राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे नाव :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना. सदर योजनेचे उद्दिष्ट : राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे.
देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनांची संधी देण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज 14 जुलै 2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
No comments