Breaking News

नागरिकांनी नवीन कायद्याची माहिती करून घ्यावी ; आता कायदा मला माहित न्हवता असा डिफेन्स चालणार नाही - पोलीस निरीक्षक शहा

Citizens need to know about the new law - Police Inspector Shah

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - भारतीय न्याय संहिता कायद्याची अंमलबजावणी दि.१ जुलै २०२४ पासून सुरू झाली. असून या भारतीय न्यायसंहिता कायद्या अंतर्गत फलटण शहर पोलीस स्टेशनला पहिला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.  कायदा मला माहीत नव्हता असा डिफेन्स यापुढे घेता येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी नवीन कायद्याची माहिती करून घ्यावी असे आवाहनही पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी यावेळी केले.

    भारतीय न्याय संहिता कायद्याची अंमलबजावणी दि.1 जुलै 2024 पासून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस स्टेशनकडून, भारतीय न्याय संहिता या कायद्या विषयी कार्यशाळा घेण्यात आली होती, याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा बोलत होते, यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे उपस्थित होते.

    पोलीस दलाचे कामकाज जे चालते, ते प्रामुख्याने तीन पुस्तकावर चालते, पहिलं पोलिसांनी कामकाज कसं करावं, याला पूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता हे नाव होतं त्याऐवजी नवीन कायद्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे नाव दिले आहे, गुन्हे व त्या गुन्ह्यास असणारी शिक्षा यास पूर्वी भारतीय दंड संहिता हे नाव होतं, त्याऐवजी आता नवीन कायद्यास भारतीय न्याय संहिता असे नाव देण्यात आले आहे, पोलिसांनी तपास करून पुरावा गोळा करून, तो न्यायालयात सादर करण्याच्या प्रक्रियेला पूर्वी भारतीय पुरावा कायदा असे नाव होते, त्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम असे करण्यात आले आहेत. पोलिसांनी करावयाचा तपास, गुन्हेगाराला असलेली शिक्षा आणि कुठला पुरावा माननीय न्यायालय ग्राह्य धरू शकेल या तीन प्रमुख पुस्तकांमध्ये जो बदल केला आहे तो बदल आजपासून अंमलात आला असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी सांगितले.

    प्रत्येक नागरिकाला नवीन फौजदारी कायदे हे माहीत असणे आवश्यक आहे, पूर्वी ज्याप्रमाणे हा कायदा मला माहीतच नाही असा डिफेन्स घेतला जात होता, तसा डिफेन्स आता घेता येणार नाही, कारण भारतात राहतो त्यास भारतीय कायदे माहित आहेत असे गृहीत धरावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाला नवीन कायदे माहित असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या फौजदारी कायद्यापेक्षा आत्ताचे नवीन फौजदारी कायदे सुधारित आहेत. अनेक नवीन तरतुदी त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक पुरावे कसे ग्राह्य धरले जातील याबद्दल तरतुदी या नवीन कायद्यात दिल्या आहेत. महिलांच्या संरक्षणासाठीही या नवीन कायद्यात तरतूद केली आहे, तसेच जेष्ठ नागरिकांसाठी देखील नवीन कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत, बऱ्याच नवीन तरतुदी, नवीन गोष्टींचा समावेश या कायद्यांमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी या नवीन कायद्याची माहिती करून घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले.

No comments