प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ १ रुपयात पीक विमा संरक्षण : दि. ३१ जुलै अंतीम मुदत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.27 - नैसर्गिक वातावरण, हवामान, पाऊस वगैरे पिकांसाठी आवश्यक बाबींमध्ये निर्माण होत असलेल्या अनिश्चितेमुळे मोठ्या मेहनतीने आलेली पिके हातची जाण्याचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव यांनी केले आहे.
प्रतिकुल हवामानामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट आदी बाबींसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना संरक्षण उपलब्ध असल्याचे कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
केवळ १ रुपया भरुन कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभागी होता येत असल्याचे निदर्शनास आणून देत इच्छुक शेतकऱ्यांनी विकास सेवा सोसायटी, नाजिकची बँक शाखा, सामूहिक सुविधा केंद्र, विमा प्रतिनिधी यांच्या मार्फत नोंदणी करावी किंवा स्वतः शेतकरी ऑनलाईन पोर्टलद्वारे यामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी ७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयं घोषणा पत्र आवश्यक असल्याचे कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांनी सांगितले.
फलटण तालुक्यात खरीप हंगामात बाजरी व कांदा या २ पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध असून बाजरी हेक्टरी १८ हजार रुपये आणि कांदा हेक्टरी ४६ हजार रुपये संरक्षित रक्कम असल्याचे सांगताना दि. ३१ जुलै २०२४ ही विमा संरक्षण मिळण्यासाठी अखेरची मुदत असल्याचे कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण तालुक्यात आतापर्यंत ३२ कर्जदार आणि ८ हजार ७७० बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ४००२.७८ हेक्टर क्षेत्रातील बाजरी व कांदा पिकांसाठी विमा संरक्षण स्वीकारले आहे. त्यामध्ये आदर्की बु|| महसूल मंडलात २९९० शेतकऱ्यांनी ११७६.६८ हेक्टर, आसू महसूल मंडलातील ८१ शेतकऱ्यांनी ५७.५३ हेक्टर, बरड महसूल मंडलातील ३८६ शेतकऱ्यांनी २२८.३५ हेक्टर, गिरवी महसूल मंडलातील ८१० शेतकऱ्यांनी ४८२.५५ हेक्टर, होळ महसूल मंडलातील २२९ शेतकऱ्यांनी १०२.१ हेक्टर, कोळकी महसूल मंडलातील ६०२ शेतकऱ्यांनी २६९.४५ हेक्टर, फलटण महसूल मंडलातील २३७ शेतकऱ्यांनी १५४.७१ हेक्टर, राजाळे महसूल मंडलातील १६१ शेतकऱ्यांनी ८४.०५ हेक्टर, तरडगाव महसूल मंडलातील १२३९ शेतकऱ्यांनी ५५१.६ हेक्टर, वाठार निंबाळकर महसूल मंडलातील २०६७ शेतकऱ्यांनी ८८५.७६ हेक्टर क्षेत्रातील बाजरी व कांदा पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
सुमारे ३०/४० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकविणाऱ्या या तालुक्यात त्यावर पडलेल्या बोंड आळी व तत्सम कीड रोग प्रादुर्भावाने येथून नामशेष झालेले कापूस पीक पुन्हा जोर धरु लागल्याने, हळू हळू या पिकाखालील क्षेत्रात होत असलेली वाढ लक्षात घेऊन शासनाने नियम, निकष शिथील करुन फलटण तालुक्यात कापूस पिकाला विमा संरक्षण उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
No comments