एकच निर्धार..बौध्द आमदार! अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.28 – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अनुसूाचित जातीसाठी राखीव आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजाला गेली तीन टर्म (१५ वर्षे) विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे, आपणास डावलले जात असल्याची भावना, निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आगामी विधानसभा निवडणुकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी, यासाठी अवघ्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी "एकच निर्धार...बौद्ध आमदार..." अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले असुन, या अभियानास तालुक्यातील सर्वच गावांत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
संवाद अभियानापुर्वी शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, कृषी, सहकार क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत "एकच निर्धार...बौध्द आमदार..." या संकल्पनेचा नारा देण्यात आला. यातून शहर व ग्रामीण भागात लोकसंवाद व गावभेट कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
दि.१३ जुलै पासून आजअखेर रोज सायंकाळी २५-३० प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ७-८ गाडयांचा ताफा गांवा-गांवात जात आहे. बैठका होत आहेत. स्थानिक नागरिक या बैठकांना उपस्थित राहुन उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. प्रमुख पदाधिकारी बैठकांना संबोधीत करत आहेत. यावेळी आपल्या समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह करतानाचे चित्र गांवा-गांवात दिसत आहे. विडणी, पिंपरद, आसू, गुणवरे, बरड, आंदरूड, तरडगाव, साखरवाडी, आदर्की, वाठार निंबाळकर, दुधेबावी, भाडळी, आसू, सरडे यासह ३५ हून अधिक गावांत संवाद अभियान पोहोचले आहे.
जो राजकीय पक्ष बौध्द समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार ग्रामीण भागातील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. आजपर्यंत बौद्ध समाजाने विविध राजकीय नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मतांच्या रूपाने मदत केली आहे. त्याचे उत्तरदायित्व म्हणुन त्यांनी आता आमच्या बौद्ध समाजाला विधानसभेची उमेदवारी मिळवुन द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संवाद अभियान दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, सचिन मोरे, शक्तीभोसले, सचिन अहिवळे, मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, राजू मारूडा, सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, नंदकुमार मोरे, बापूसाहेब जगताप, विकास काकडे, दत्ता अहिवळे, संग्राम अहिवळे, सनी काकडे, हरीष आप्पा काकडे, संदीप काकडे, उमेश कांबळे, शितल अहिवळे, शाम अहिवळे, कपिल काकडे, विकी काकडे, महादेव आप्पा गायकवाड, अमित भोसले, रोहित माने, सागर अहिवळे आदी मान्यवर सहभागी आहेत.
No comments