गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ३० प्रस्ताव दाखल : २३ प्रकरणे मंजूर : २ नामंजूर : ५ प्रलंबीत
फलटण - दि. 29 : गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०२३ - २४ मध्ये फलटण तालुक्यात एकूण २७ प्रस्ताव दाखल झाले, त्यापैकी २२ मंजूर झाले असून ३ कागद पत्रांच्या अपूर्तततेमुळे प्रलंबीत आहेत, तर २ नामंजूर झाले आहेत, त्यापैकी ७ प्रस्तावातील कुटुंबांना अनुदान रक्कम १४ लाख रुपये अदा करण्यात आल्याची तर सन २०२४ - २५ या वर्षात ३ प्रस्ताव दाखल झाले, एक मंजूर झाला असून उर्वरित २ कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी प्रलंबीत असल्याची माहिती तहसीलदार तथा योजना समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
अनुदानाचा लाभ कोणाला मिळू शकतो
शेतकरी कुटुंबातील कोणाबाबत रस्ता अपघात, वीजेचा शॉक, खून, सर्प दंश, पाण्यात बुडून मृत्यू, कीटक नाशक फवारतांना अथवा अन्य कारणाने होणारी विषबाधा, झाडावरुन अथवा उंचावरुन पडल्याने झालेली दुर्घटना अशा प्रसंगात मृत्यू किंवा अपंगत्व आल्याने उत्पन्नाचे साधन बंद झाल्यास सदर कुटुंबाने त्याबाबत आवश्यक कागद पत्रांसह आपला प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल केल्यास छाननी करुन समितीसमोर ठेवून निर्णय घेतला जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
अनुदान रक्कम किती असते
गोपीनाथ मुंढे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघाती मृत्यू, अपघातामुळे २ डोळे अथवा २ हात किंवा २ पाय निकामी होणे, अपघातामुळे १ डोळा एक हात किंवा एक पाय निकामी होणे यासाठी २ लाख रुपये आणि अपघातामुळे १ डोळा अथवा १ हात किंवा एक पाय निकामी होणे यासाठी १ लाख रुपये अनुदान उपलब्ध होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना दि. १९ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यान्वित झाली असून सदर शासन निर्णयानुसार दाखल प्रस्तावांची छाननी व कागद पत्रांची पूर्तता करुन घेऊन प्रस्ताव मंजुरीसाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून तालुका कृषी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत, तर समिती सदस्य म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा प्रतिनिधी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधी या समिती मध्ये काम पाहणार आहेत.
फलटण तालुक्यात २७ प्रस्ताव दाखल
फलटण तालुक्यात सन २०२३ - २४ मध्ये एकूण २७ प्रस्ताव दाखल झाले, त्यापैकी २२ मंजूर प्रस्तावांना प्रत्येकी २ लाख रुपयांप्रमाणे ४४ लाख रुपये बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत, ७ प्रस्ताव लाभार्थी यांची १४ लाख रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून उर्वरित रक्कम संबंधीत खात्यात वर्ग करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले आहे.
२३ जणांना अनुदान मंजूर : ७ जणांच्या बँक खात्यात वर्ग
सन २०२३ - २४ मधील मंजूर २२ प्रस्तावांपैकी झाडावरुन पडून व पाण्यात बुडून प्रत्येकी १ आणि वीजेचा शॉक लागून दोघांचा तर उर्वरित १८ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान स्वरुपात मंजूर झाल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजूर झालेल्यांमध्ये
१) कै. महादेव शंकर बिचुकले, आदर्की खु (झाडावरुन पडून मृत्यू), २) कै. विशाल बाळकृष्ण नाळे, विडणी (रस्ता अपघात), ३) कै. दिगंबर पांडुरंग घनवट, पिंप्रद (रस्ता अपघात), ४) कै. नानासाहेब रामचंद्र घनवट, कुरवली खु (रस्ता अपघात), ५) कै.धनाजी माणिक जाधव, जाधववाडी (वीजेचा शॉक), ६) कै. जगन्नाथ पुरुषोत्तम गुरव, राजाळे (रस्ता अपघात), ७) कै. सचिन नागनाथ धायगुडे, डोंबाळवाडी (खून), ८) कै. निसर्ग सूर्याजी जगताप, उपळवे (पाण्यात बुडून), ९) कै. चंद्रकांत आण्णा गुरव, तरडफ (रस्ता अपघात), १०) कै. संतोष मारुती गिरी, तरडफ (रस्ता अपघात), ११) कै. निवृत्ती आनंदा खुडे, तरडगाव (रस्ता अपघात), १२) कै. मंगल महादेव बिचुकले, वाठार निंबाळकर (रस्ता अपघात), १३) कै. नरेंद्र नारायण घाडगे, काळज (रस्ता अपघात), १४) कै. राहुल शिवाजी वाघमोडे, राजाळे (रस्ता अपघात), १५) कै. सुनिल तानाजी शिंदे, ठाकुरकी (वीजेचा शॉक), १६) कै. रविंद्र विठ्ठल जाधव, आदर्की खु (रस्ता अपघात), १७) कै. गोरख आण्णा कोळेकर, नांदल (रस्ता अपघात), १८) कै. शशिकांत पांडुरंग शिंदे, तांबवे (रस्ता अपघात), १९) कै. किसन बाजीराव भंडलकर, आदर्की बु (रेल्वे अपघात), २०) कै. सुलोचना अरविंद नाळे, विडणी (रस्ता अपघात), २१) कै. विजय किसनराव शिंदे, मुंजवडी (रस्ता अपघात), २२) कै. विशाल शिवाजी लंभाते, उपळवे (रस्ता अपघात) यांचा समावेश आहे. त्यापैकी ७ कुटुंबांचे मंजूर अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असून उर्वरित प्रकरणात अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.
सन २०२४ - २५ या वर्षात दाखल ३ प्रस्तावांपैकी कै. प्रकाश भानुदास कोल्हे, विडणी (रस्ता अपघात), यांचा प्रस्ताव मंजूर झाला असून उर्वरित २ प्रस्ताव प्रलंबीत आहेत.
No comments