प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची स्मृती कायमस्वरूपी जतन होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रयत्न करावेत - सचिन सूर्यवंशी बेडके
फलटण : ‘‘ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची स्मृती फलटण शहरामध्ये कायमस्वरूपी जतन होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणने पुढाकार घेऊन यासाठी प्रयत्न करावेत’’, अशी अपेक्षा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ.सचिन बेडके बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार प्रा.रवींद्र कोकरे, म.सा.प. फलटणचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, श्रीराम विद्याभवन शालेय समितीचे चेअरमन रविंद्र बर्गे व जी.एम.जाधव हे उपस्थित होते.
‘‘प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यामुळे फलटण शहराला एक वेगळी ओळख मिळाली आहे. प्राचार्यांची ग्रंथसंपदा, त्यांना मिळालेले बहुमान, त्यांच्या व्याख्यानांच्या ध्वनीफिती अशा संग्राह्य गोष्टींचे एखादे कायमस्वरुपी दालन फलटण शहरामध्ये होणे गरजेचे असून यासाठी म.सा.प.फलटण शाखेने प्रयत्न करावेत’’, असे सांगून डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी आपले पिताश्री कै.सुभाषकाका सूर्यवंशी बेडके व प्राचार्य भोसले यांच्या अनेक आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला.
‘‘साहित्याच्या व प्रबोधनाच्या दिंडीतील अग्रस्थानी असणारे असे प्राचार्य शिवाजीराव भोसले होते. साहित्यातील त्यांचा व्यासंग साता समुद्रापार पोहोचला असून आजही प्राचार्य भोसले सरांचे चाहते देश-विदेशात आपणास पाहायला मिळतील. प्राचार्य भोसले सरांच्या अमोघवाणीने पुण्यातील वसंत व्याख्यानमालेला एक उंची प्राप्त करून दिली होती. त्याकाळी त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी तिकिटे काढून रसिक मंडळी येत असत त्यांच्या विशिष्ट वक्तृत्वाच्या शैलीने रसिक मंत्रमुग्ध होत असत’’, असे प्रा. रवींद्र कोकरे यांनी सांगितले.
‘‘कमवा शिका’ योजने अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन पुढे फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा प्रेरणादायी प्रवास आजकालच्या विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी’’, असे मत प्राचार्य शांताराम आवटे यांनी व्यक्त केले.
‘‘वक्तृत्व पंढरीचे पांडुरंग, माणुस घडवणार्या साहित्याचे प्रतिभावान लेखक प्राचार्य भोसले सर यांची ओळख तरुण पिढीला होणे गरजेचे असून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण त्या दृष्टीने कृतिशील कार्यक्रम तयार करून प्राचार्यांची स्मृती जतन करण्यासाठी दर महिन्याच्या 29 तारखेला प्राचार्यांच्या साहित्यावर, विचारांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा किंवा वाचनसत्र आयोजित करण्याचा प्रयत्न करेल’’, असे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राचार्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक अरुण खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन म.सा.प.फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे यांनी केले.
कार्यक्रमास आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
No comments