चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पाहिले उभे रिंगण संपन्न
तरडगाव (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ जुलै २०२४ - आज संततधार पाऊस सुरू असतानाच टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष सुरु असतानाच माऊलींचा व स्वाराचा असे दोन्ही अश्व एकामागून एक दौडले आणि माऊली....माऊली नामाचा जयघोष सुरु झाला. अशा भक्तीपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील पुरातन चांदोबाचा लिंब येथे आज सोमवारी दि. ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडले. सायंकाळी सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदहुन दुपारच्या जेवणानंतर १.३० वा. निघाला फलटण तालुक्यातील वेशीवर सरहद्द ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत झाले. स्वागत स्वीकारल्या नंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाला. पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंब येथे नगारा, माऊलींचे घोडे, दिंड्या आल्या, माऊलींच्या रथापुढील दिंड्या मध्ये चोपदाराने ऊभे रिंगण लाऊन घेतले, दुपारी ४.०० ला माऊलींचा अश्व व घोडेस्वाराचे घोडे सुसाट वाऱ्याच्या वेगाने धावले, नंतर घोड्यांना खारिक खोबरे गुळाचा प्रसाद खाऊ घालतात व नंतर माऊलींच्या गजराचा जल्लोष झाला.
धावत येणाऱ्या माऊलींच्या त्या अश्वांना पाहण्यासाठी असंख्य नजरा आतूर झाल्या होत्या. उत्साही वातावरणातच सायंकाळी ४:३० वाजता दोन्ही अश्व वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करीत धावले. या दोन अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत रथाकडे वळून त्यातील पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी जोरात धाव घेत उभे रिंगण पूर्ण केले.
No comments