फलटणच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात रोजच ट्रॅफिक जाम ; प्रशासनाचे दुर्लक्ष
फलटण (ॲड.रोहित अहिवळे) - दि.२९ जुलै - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, फलटण येथे ट्रॅफिक जामची समस्या आता नित्याचीच झाली असून. या रस्त्यावरून जाताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या चौकामध्ये ट्रॅफिकला शिस्त नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. या चौकामध्ये दिवसातून दोन ते तीन वेळा ट्रॅफिक जामच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागते, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
फलटण नगर परिषद आणि फलटण शहर पोलीस स्टेशन यांनीही ट्राफिक समस्येची बाब गांभीर्याने घेऊन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील अतिक्रमणे दूर करण्याबरोबरच चौकापासून चारही बाजूला कोणतीही वाहने उभी राहू नयेत याची दक्षता घेऊन ही वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.
शहरातील बाजार पेठेतही वाहतुकीची समस्या जवळपास सर्वच ठिकाणी जाणवत असून, त्यावर योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता असुन, पुरेसे वाहतूक पोलीस असतानाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होताना दिसत नाही, दोन्ही चौकात वाहतुकीची कोंडी सतत दिसत असते. वाहतूक कोंडी न व्हावी त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणांनी विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments