नागपंचमी नंतर रस्ता, लाईट खांबावरील मांजा गोळा करून त्याची केली होळी : स्तुत्य उपक्रम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - नागपंचमी सणा निमित्त फलटण परिसरात पतंग उडवल्या जातात, या पतंगीच्या मांजामुळे पशुपक्षांसह माणसांनाही गंभीर दुखापत होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण येथे राजाभाऊ देशमाने, राहुल शहा मित्रमंडळींनी नागपंचमी सण झाल्यानंतर रात्री शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून, अडकलेला मांजा गोळा करून त्याची होळी केली.
दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी झाल्यानंतर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मांजा पडलेला दिसून आल्याने, राजाभाऊ देशमाने, राहुल शहा, मोहन जामदार, मनेष जामदार, सोनवलकर मिस्त्री, शरद दीक्षित, विजय उंडाळे, प्रणव जामदार या मित्रमंडळींनी रात्री रविवार पेठ बाजारपेठ, उमाजी नाईक चौक, महात्मा फुले चौक, श्रीराम मंदिर परिसरात फिरून रस्त्यावर आलेला मांजा तसेच लाईटच्या खांबावर अडकलेला मांजा काठीच्या सहाय्याने गोळा करून त्याची रस्त्यावर होळी केली.
रस्ता व लाईटच्या खांबांवर असणाऱ्या मांजा मुळे पक्षांना तसेच लोकांना दुखापत होऊ नये म्हणून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे फलटण बाजारपेठेत कौतुक होत आहे.
No comments