Breaking News

महाविद्यालयीन नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या लेखनप्रतिभा अभिव्यक्तीचे उत्तम व्यासपीठ होय - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

College magazine is a great platform for students to express their writing talent - Sanjivraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षांमध्ये नियमितपणे वार्षिक नियतकालिकांचे संपादन व प्रकाशन होत असते. या नियतकालिकांमधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भाव-भावना,विचार, कल्पना प्रभावीपणे अभिव्यक्त होत असतात. या माध्यमातून गावपातळी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण घटना तसेच घडामोडींचे वैचारिक प्रतिबिंब यामध्ये प्रकटत असते. गद्य आणि पद्य या प्रमुख लेखन प्रकारासह विविध प्रकारच्या ललित व वैचारिक लेखनाच्या रूपाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनातील विचार व कल्पना या माध्यमातून प्रकटत असतात. म्हणून महाविद्यालयीन  नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या लेखनप्रतिभा अभिव्यक्तीसाठी उत्तम व्यासपीठ ठरते असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

    स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या ‘उदय’  या वार्षिक नियतकालिक प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर फलटण एज्युकेशन सोसायटी, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मा. पार्श्वनाथ राजवैद्य, समारंभाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, ‘उदय‘ चे प्रमुख संपादक डॉ. अशोक शिंदे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डी.एम. देशमुख, निवृत्त प्रभारी प्राचार्य डॉ.सुधीर इंगळे, निवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विक्रम आपटे आणि उदय नियतकालिकाचे सल्लागार व संपादक मंडळ सदस्य उपस्थित होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे यांच्या शुभहस्ते ‘उदय’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

     श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, सध्या प्रिंटिंग ट्रेंडचा काळ संपत चालला आहे. अभिव्यक्तीची नवीन नवीन साधने तथा सामाज माध्यमे आज सर्वत्र उपलब्ध होत आहेत. अशा काळात मात्र महाविद्यालय नियतकालिके ही दरवर्षी संपादित व प्रकाशित होत आहेत, ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. मुधोजी महाविद्यालयाचे ‘उदय’ हे वार्षिक नियतकालिक गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा जपून आहे. विद्यापीठ स्तरावर या अंकाने प्रथम क्रमांक पटकावून सर्वच पातळीवरील आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. विद्यापीठस्तरावर आणि विद्यार्थ्यांच्या मनावर उदयने आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. या नियतकालिकाच्या माध्यमातून संपादक मंडळांनी विविध विषय व लेखन प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी नेमकेपणाने मार्गदर्शन केलेले दिसते. या अंकातील मुलाखत, वैचारिक , ललित, संशोधनपर लेखन आणि कलादालन यातील सर्वच कलाकृतीमध्ये  विद्यार्थ्यांची सर्वोत्तम प्रतिभा प्रकटलेली दिसते. चोखंदळ वाचकांसाठी हा अंक एक उत्तम पर्वणी ठरेल असे मला वाटते. असे सांगून या उत्तम कार्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व संपादक मंडळाचे विशेष कौतुक केले आणि विद्यापीठ स्तरावर यावर्षीही ‘उदय’ भरघोस यश संपादन करेल अशी शुभेच्छाही व्यक्त केली. 

    याच समारंभात श्रीमंत संजीवराजे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयीन शैक्षणिक दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमात आणि नियोजनात ही दिनदर्शिका उपयुक्त ठरेल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

    प्रास्ताविकामध्ये प्रमुख संपादक डॉ. अशोक शिंदे यांनी ‘ उदय‘ या नियतकालिकास खूप दीर्घ परंपरा आहे. महाविद्यालयाच्या प्रारंभापासूनच उदय संपादित केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ललित,वैचारिक आणि कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. नियतकालिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार व्यक्त करण्याची संधी मिळते. तसेच ‘उदय’ मध्ये  महाविद्यालयातील विविध विषय विभाग आयोजित  विविध उपक्रमांचा छायाचित्रासह अहवाल देखील प्रसिद्ध केला जातो, त्यामुळे या अंकात महाविद्यालयातील वार्षिक घडामोडींचे प्रतिबिंब उमटलेले असते. 

    अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी उदयच्या निर्मितीबाबत सविस्तरपणे सांगितले.  विशेषतः चालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय  शैक्षणिक धोरणाबाबतची  भूमिका समजावी या दृष्टीने या नियतकालिकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ अत्यंत बोलके व आशयघन आहे.  मुखपृष्ठाबद्दल आणि एकूणच अंकाच्या संपादनाबद्दल त्यांनी संपादक मंडळाचे कौतुक केले. अलीकडच्या काळात महाविद्यालयाचे मुखपत्र म्हणून ‘उदय’ ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी वाचक आणि परीक्षक या अंकाची उचित दखल घेतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. उदय हा एक वर्षभरातील शैक्षणिक घडामोडींचा साक्षीदार म्हणूनही महत्त्वाचा ठरतो तर शैक्षणिक दिनदर्शिका ही वर्षभरामध्ये राबवावयाचे अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमांचे पूर्वनियोजन असून तो शैक्षणिक उपक्रमांचा आरसा आहे. त्यामध्ये शासनाने जाहीर केलेल्या महापुरुषांच्या, समाजसुधारक, संस्थानिक यांच्या छायाचित्रांचे संकलनामुळे दिनदर्शिका बहारदार बनल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. त्यासाठी समन्वयक डॉ. टी.पी शिंदे व प्रकाश शिंदे यांचे कौतुकही केले.

    या समारंभाच्या वेळी ‘उदय’ संपादक मंडळातील सर्व  सदस्यांचा, दिनदर्शिका संपादक तसेच मुखपृष्ठ व मलपृष्ठ साकरणारे महेश सुतार व अंकांची सुरेख व सुबक रचना आणि बांधणी करणारे ‘सन ग्राफिक्सचे‘ उमेश निंबाळकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. 

     प्रा. शैला क्षीरसागर व प्रा. दिलीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. सौ उर्मिला भोसले यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments