फलटण येथे आज मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सायकल वाटप व कामगार मेळावा ; कार्यकर्त्याला वापरा व फेकून द्या अशी भावना चुकीची - रणजितसिंह यांचा राजेगटावर निशाणा
फलटण ( ॲड. रोहित अहिवळे) दि.१७ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १५ हजार मुलींना सायकल वाटप करण्याचा संकल्प केला होता, त्यातील एक टप्पा मागील महिन्यात ३ हजार सायकलीचे वाटप करण्यात आले, काल माण तालुक्यामध्ये देखील सायकलींचे वाटप करण्यात आले. उद्या दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ मंगल कार्यालय, विंचुर्णी रोड, फलटण येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते गरजू मुलींना ५ हजार सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार मेळावा व लाभार्थींना लाभ वाटपाचा कार्यक्रम कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता श्रीदत्त कृपा मंगल कार्यालय, रावरामोशी पुलाजवळ फलटण - पंढरपूर रोड, फलटण येथे होणार असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'एक वेळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी आमची तडजोड होईल मात्र शिवरूपराजे यांच्याशी नाही' या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्यावर बोलताना रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, रामराजेंची सवयच आहे की, एकाला जवळ घ्यायचं आणि की दुसऱ्याला मारायचं, पण शिवरूपराजे यांच्याशी आम्ही मैत्री केली आहे, आणि आम्ही मैत्रीसाठी छातीचा कोट करत असतो, शिवरूपराजे यांच्यावर होणारा राजकीय, बौद्धिक, शाब्दिक हल्ल्यात आम्ही शिवरूपराजे यांच्या सोबतच असणार आहोत आणि तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर सर्वच निवडणुकीत आम्ही शिवरूपराजे यांना बरोबर घेऊनच पुढील वाटचाल करणार आहोत.
माणिकराव सोनवलकर यांच्यानंतर भाजपा प्रवेशांबद्दल रणजीतसिंह यांना विचारले असता पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीजण प्रवेश करणार आहेत तसेच त्याच्या पुढील आठवड्यात देखील राष्ट्रवादीचे काहीजण प्रवेश करणार असल्याचे सांगतानाच, निरा देवघर कॅनॉलचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, नाईकबोमवाडी एमआयडीसी चे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अशा भूमिकांना विरोध करण्यासाठी व तालुक्यात काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे या विचारानेच अनेकजण भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. माणिकराव सोनवलकर यांनी तर आर्थिक नुकसान सोसून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे रणजीतसिंह यांनी सांगितले.
शिवरूपराजे यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, राजे गटाच्या राजकीय यशामध्ये शिवरूपराजे यांचा सिंहाचा वाटा होता तरीही त्यांच्यावर राजे गटाने अन्याय केला, तीस वर्षे वापरून घेतल्यानंतर आता एका दिवसात शिवरूपराजे हे बाहेरचे झाले का? कार्यकर्त्याला वापरा व फेकून द्या अशा पद्धतीची भावना चुकीची असल्याचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments