वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पालघर, दि. ३० (जिमाका) : देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदर विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आदी यावेळी उपस्थित होते.
मराठी भाषेतून संवाद साधत भाषणाची सुरुवात सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकाचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली.
सिंधुदुर्ग येथील घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी मस्तक टेकून मी माफी मागतो, असे सांगून प्रधानमंत्री पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर मी सर्व प्रथम रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर जाऊन प्रार्थना केली होती. भक्तिभावाने आशिर्वाद घेऊन राष्ट्रसेवेला प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी आराध्य दैवत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आजचा दिवस हा विकसित महाराष्ट्र विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या विकास यात्रेतील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला एक समृद्ध व संसाधनयुक्त समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असून यामुळे भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळेच 76,200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा, देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच बंदरामधून जेवढी कंटेनर वाहतूक होते, त्यापेक्षाही जास्त कंटेनर वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होणार आहे. हे बंदर देशाच्या व्यापार व औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे. वाढवण बंदरामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून एक नवी ओळख निर्माण होईल. तसेच हा परिसर वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांना जोडला जाणार आहे. यामुळे वाढवण बंदरात वर्षभर कंटेनरची वाहतूक होणार आहे. या क्षेत्राची ओळख पूर्वी किल्ल्यांमुळे होत होती आता ही ओळख आधुनिक पोर्टमुळे होणार आहे.
वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होणार
मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून सुमारे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने नेहमीच मोठे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा विकास ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. त्यामुळेच नुकतेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिघी येथे बंदर औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे. ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नाचे प्रतिक बनेल. या पोर्टमुळे पर्यटन व इको रिसोर्टला चालना मिळेल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सागरी ताकदीला वेगळी ओळख
मच्छिमार बांधवांसाठी आज 700 कोटीहून अधिक योजनांचा शुभारंभ केला आहे. तसेच वाढवण बंदर, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र, विविध मत्स्य व्यवसायाच्या योजनांचा शुभारंभ ही मोठमोठी कामे माता महालक्ष्मी, माता जिजाऊ, माता जीवदानी व भगवान तुंगारेश्वर यांच्या आशिर्वादने होत आहेत, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी, सागरी ताकदीला एक वेगळी ओळख दिली. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ईस्ट इंडिया कंपनीला धडकी भरवली होती. त्यांच्या या वारसाकडे नंतरच्या काळात लक्ष दिले गेले नाही. पण आजचा भारत हा नवीन भारत आहे. नवीन भारत देशात अनेक बदल घडवीत आहे. नवीन भारत आपल्या सामर्थ्याला व गौरवांना ओळखतो. सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत. देशातच जहाज निर्मिती होण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यातून या क्षेत्रात कोट्यवधींची गुंतवणूक करत आहोत. यामुळे जहाज वाहतुकीचा वेळ कमी होत असून याचा फायदा व्यापारी व उद्योगांना होत असून तरुणांना नवी संधी मिळत आहे. देशातील बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादन करणार देश झाला असून मत्स्य उत्पादनातही गेल्या नऊ वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. झिंगा निर्यातही दुप्पट झाली आहे. मत्स्य उत्पादन क्षेत्रात महिलांचे योगदान वाढविण्यात केंद्र सरकार अग्रेसर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान
देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे योगदान मोठे आहे. सागरी क्षेत्रातील विकासात मच्छिमार बांधवांचे योगदान आहे. 526 गावे, कोळीवाडे आणि 15 लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राचे मत्स्यपालन क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने आदिवासी तसेच मच्छिमारांसाठी वेगळे मंत्रालय निर्माण केले आहे. मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारण्याला प्राधान्य दिले असून त्यांच्या हितासाठी योजना बनविण्यात येत आहेत. मच्छिमार बांधवांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी मच्छिमार संस्था मजबूत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आज शुभारंभ केलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजना तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमुळे मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारून आर्थिक संपन्नता येणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
वाढवण बंदर प्रकल्पाची वैशिष्ट्ये
वाढवण बंदर या प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपये खर्च येणार आहे.
भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर बनणार आहे. हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबर आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी व्यापार कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
2047 पर्यंत विकसित भारताच्या अमृतकाल दृष्टिकोनासाठी महत्त्व पूर्ण प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर स्थित वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. या बंदराच्या उभारणीमुळे अमृतकाल दरम्यान भारताच्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेऊन रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार असून या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान मिळणे अपेक्षित आहे.
वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करणे यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, हे बंदर भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करणार आहे.
वाढवण बंदर प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे.
मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्प
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमात 757.27 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी.
यामध्ये मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण आणि फिश मार्केटचे बांधकाम यांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मासे आणि सीफूडच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छताविषयक परिस्थिती प्रदान करण्यात येणार आहे.
या क्षेत्रांमध्ये मासेमारी उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आंध्र प्रदेश, केरळ आणि ओरिसा या राज्यांमध्येही लागू केले जाणार आहे.
मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसविण्याचा शुभारंभ
364 कोटी रुपये खर्चून एक लाख मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याच्या योजनेचा देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. समुद्रातील मच्छिमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि संकटाच्या वेळी त्यांना संवाद साधता यावा यासाठी हे स्वदेशी ट्रान्सपॉन्डर इस्रोने विकसित केले आहेत. स्वदेशी ट्रान्सपॉन्डरमुळे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना संकटकाळात संपर्क साधण्यास व मदत पोचविण्यास सहाय्य होणार आहे.
No comments