समता घरेलू कामगार संघटना घर कामगार महिलांना आधार देणारी संघटना - आ. दीपक चव्हाण
शालेय साहित्याचे वाटप करताना आ. दीपक चव्हाण, सुपर्णा अहिवळे, सुधीर अहिवळे, कल्पना मोहिते वर अन्य |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ : घरेलू कामगार महिलांना शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा मिळ्याव्यात व त्या पासून कोणी वंचित राहणार नाही यासाठी व त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी समता घरेलू कामगार संघटना या संघटनेच्या माध्यमातून एक चांगली संधी निर्माण झाली आहे. ही खऱ्या अर्थाने घर कामगार महिलांना आधार देणारी संघटना असून तीला आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.
समता घरेलू कामगार संघटना यांच्यावतीने फलटण येथे मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक भवन येथे घर कामगार महिलांच्या पहिली ते आठवीतील सुमारे अडीचशे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सानिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सुपर्णा अहिवळे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे, संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते, पत्रकार किरण बोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घरकुल, आरोग्यविमा अशा अनेक योजना आहेत त्या घरेलू कामगार महिलाना मिळायला हव्यात अशी भूमिका आपण नेहमीच मांडत आलो आहोत, ज्या ज्या वेळी या क्षेत्रातील महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनाचे पदाधिकारी त्यांचे प्रश्न, समस्या आपल्याकडे घेऊन आले, त्या त्या वेळी ते प्रश्न आपण सभागृहात मांडले आहेत असे सांगून समता घरेलू कामगार संघटनेस आम्हा सर्वांचे सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार दीपक चव्हाण यांनी या वेळी दिली.
संघटनेच्या कार्याची माहिती देऊन घरेलू कामगार महिलांना पेन्शन मिळावी, त्यांच्या मुलांना आरोग्य वीमा मिळावा, २००८ च्या कायद्यान्वये सुरु झालेली व निधी अभावी बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करावी, ५५ ते ६० वयोगटातील घर कामगार महिलांना दहा हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात यावा. घरकामगार महिलांचा समावेश दारिद्र्य रेषेत केला जावा व त्यांना नियमित रेशन व घरकुल मिळायला हवे या प्रमुख समस्याकडे संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते यांनी प्रस्ताविकात लक्ष वेधले.
यावेळी मुलांना वह्या, कंपास, पेन्सिल बॉक्स आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. रेश्मा पठाण यांनी केले. आभार शीतल मोहिते यांनी मानले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments