Breaking News

पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी करा, माझे सहकार्य राहील - श्रीमंत रामराजे ; फलटण - कोरेगाव मतदार संघात बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी ; संविधान समर्थन समितीकडून श्रीमंत रामराजे यांच्याकडे मागणी

In Phaltan-Koregaon Constituency, the Buddhist community should be nominated in the elections; Demand from the Sanvidhan Samarthan Samiti to Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ (अ.जा.)  निवडणुकीत बौध्द समाजाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी अशी मागणी, संविधान समर्थन समिती, फलटणच्या वतीने,  विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रितसर उमेदवारीची मागणी करा, माझे सहकार्य राहील. माझा बौद्ध समाजाच्या उमेदवारीला विरोध नाही, अशी सकारात्मक भूमिका श्रीमंत रामराजे यांनी घेतली.

 फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी "एकच निर्धार...बौद्ध आमदार..." अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले असुन, या अभियानास तालुक्यातील सर्वच गावांत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रमुख पक्षांकडे बौद्ध उमेदवार द्यावा,अशी मागणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन, संविधान समर्थन समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,  फलटण मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते, आगामी विधानसभा निवडणुकीत, बौद्ध समाजाचा प्रतिनिधी (तिकीट) द्यावा असा प्रस्ताव देत आहोत.

    आपल्या निर्णयामुळे येथील अनुसूचित जाती मधील संख्याबहुल बौद्ध समाजाला राज्याच्या विधानसभेमध्ये प्रतीनिधित्व करण्याची संधी मिळेल. आणि आपल्या पक्षाची ताकत व बौद्ध समाजाची संख्या यामुळे निश्चितच १०० टक्के आपला उमेदवार आमदार होईल. या विधानसभेनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या सर्व निवडणुकीला सर्व बौद्ध समाज आपल्या पाठीशी एक निष्ठेने नक्कीच उभा राहील.

    तरी, उपरोक्त विषयास अनुसरून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या माध्यमातून (आपणास योग्य वाटणाऱ्या तथा आपल्या पक्षासाठी कार्यरत असणाऱ्या) बौद्ध समाजाच्या व्यक्तीला यावेळी आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी, ही विनंती.

No comments