छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते उद्घाटन
ऐतिहासिक काळापासून भोसले आणि नाईक निंबाळकर घराण्याचे संबंध - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, खरंच मी भाग्यवान आहे. सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा प्रतापगडावर उभारण्याचे काम फलटण संस्थांचे पूर्वअधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने झाले होते. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला श्रीमंत मालोजीराजे यांनी तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रतापगडावर आणून भव्य दिव्य कार्यक्रम केला होता. त्याचीच प्रचिती आज मला होत आहे.असे उद्गार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.
साखरवाडी तालुका फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी छत्रपती उदयनराजे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
छ. उदयनराजे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना महाराष्ट्र किंवा देशापूर्ती सीमित नाही. सर्व जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला.जगामध्ये अनेक राजे होऊन गेले त्यांनी ज्या लढाया, आक्रमण केली ती साम्राज्य वाढवण्यासाठी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया, आक्रमण ही लोकांवरती होणाऱ्या अन्याया विरुद्ध केली. त्याकाळी महाराजांनी पुरोगामी विचार देऊन सर्वधर्मभाव हा विचार धरून, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी कार्य केले. त्याच सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी आपल्या तुमच्या पूर्वजांनी काम केले आणि तोच विचार पुढे घेऊन आज आपण छत्रपतींच्या विचारांनी बंधुत्वाच्या नात्याने एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहोत. महाराजांनी दिलेले हे स्वराज्य टिकवण्याचे काम तुमच्या आमच्या हातात आहे. देव कुणी पाहिला नाही छत्रपती शिवाजी महाराज हेच आपल्यासाठी दैवत आहे असेही शेवटी छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ऐतिहासिक काळापासून भोसले आणि नाईक निंबाळकर घराण्याचे संबंध आहेत, इथून पुढेही हे संबंध पुढची पिढी टिकवणार यात शंका नाही.आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आला तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि साखरवाडी येथील छत्रपतीच्या पुतळ्याचे उद्घाटन छत्रपतींचे थेट वंशज उदयनराजे यांच्या हस्ते होत आहे, त्याचा मला आनंद आहे. फलटणच्या साखरवाडी सारख्या ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण ठेवण्यासाठी अश्वारूढ पुतळा असावा अशी मनोमन इच्छा होती, ती इच्छा पूर्ण होताना आज समाधान होत आहे. साखरवाडीच्या वैभवात भर घालण्याचे काम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व स्मारक समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे, ते टिकवण्याचे काम साखरवाडीकरांनी आता केले पाहिजे. महाराणी सईबाईराजे भोसले यांच्या वेल्हा येथील समाधी स्थळाच्या स्मारकाचे व मल्हारराव होळकर यांच्या मुरूम तालुका फलटण येथील जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या आणि फलटण येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाचेही आमंत्रण यावेळी श्रीमंत रामराजे यांनी उदयनराजेंना दिले.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन सुधीर नेमाने यांनी केले. कार्यक्रमास शिवभक्त, ग्रामस्थ असंख्य संख्येने उपस्थित होते.
No comments