कामगार मंत्र्यांकडून कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी ; कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले कंपनींच्या तपासणीचे आदेश ;
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी फलटण तालुक्यातील कंपन्यांचा आढावा घेतला. दरम्यान यावेळी कमिन्स कंपनी संबंधात कामगारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर सुरेश खाडे यांनी कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून पुढील आठवड्यात बैठक घेऊन, लेबर अधिकाऱ्यांना फलटण तालुक्यातील कंपन्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी फलटण येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते गरजू मुलींना ५ हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच कामगार मेळावा व लाभार्थींना लाभ वाटप कार्यक्रमासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे फलटण येथे आले असता कोळकी, फलटण येथील रेस्ट हाऊस येथे, फलटण तालुक्यातील कंपन्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी ना.सुरेश खाडे बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धनंजय साळुंखे पाटील, विक्रमसिंह भोसले, अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, सचिन कांबळे पाटील यांच्यासह कामगार आयुक्त व लेबर ऑफिसर्स उपस्थित होते.
बैठकीदरम्यान माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी कमिन्स कंपनीमध्ये, कामगारांना असणारा पगार व प्रत्यक्षात दिला जाणारा पगार यामध्ये तफावत असून, दिला जाणारा पगार हा कागदावर एक असतो आणि प्रत्यक्षात मात्र थोडासा पगार दिला जातो हे निदर्शनास आणून दिल्यानंतर, तिथे उपस्थित कामगाराने मंत्री महोदयांसमोर नोटीस न देता कामावरून कमी केल्याबाबत सांगितले.
त्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कंपनी चालवत असताना त्यामध्ये राजकारण आणले तर बरोबर नाहीये, तुमचा राजकारणाशी संबंध नाही, तुम्ही कंपनी चालवत असताना कामगारांचे व कंपनीचे हित लक्षात घेऊनच चालले पाहिजे, जरी नोकर भरती ठेकेदारामार्फत करत असला तरी, तुम्हाला ठेकेदारांना, कामगारांना कमी का केले? हे विचारण्याचा अधिकार आहे. जी माणसं दोन वर्ष, तीन वर्ष, पाच वर्ष काम करतात, त्यांना काढलं का जातं ? हे पाहणं तुमचं काम आहे. जर ठेकेदार चुकीचे काम करत असेल तर त्याला तुम्ही कंपनीद्वारे मेमो काढू शकता. कंपनीला वेठीस धरून, कामगाराला वेठीस धरून मधल्या मध्ये कोणी मलई खात असेल तर मी सहन करणार नाही, पुढील आठवड्यात या संबंधित बैठक लावून, तालुक्यातील कंपन्यांची तपासणी करा व सर्व रिपोर्ट मला द्या अशा सूचना लेबर ऑफिसर्स यांना दिल्या.
No comments