माणिकराव सोनवलकर यांचा भाजपामध्ये प्रवेश ; राजे गटाला धक्का
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजे गटाचे विश्वासू सहकारी माणिकराव सोनवलकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
माणिकराव सोनवलकर यांच्या भाजपा प्रवेश मुळे राजे गटाला मोठा धक्का बसला आहे. माणिकराव सोनवलकर हे दोन वेळा कोळकी जिल्हा परिषद गटातुन निवडुन आले आहेत. फलटण तालुक्यातील धनगर समाजातील चळवळीत काम करणारे व सर्व सामान्य जनतेत मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते, आज पर्यंत राजे गटाची कोळकी जिल्हा परिषद गटात धुरा ते संभाळत होते.
राजे गटाचे अनेक कार्यकर्ते नाराज असून लवकरच त्यांचे प्रवेश भाजपामध्ये होतील असे पक्ष प्रवेश नंतर सोनवलकर यांनी सांगितले. तसेच मा. खासदार रणजितसिह नाईक यांच्या कार्य पध्दतीमुळे आम्ही भारावून गेलो आहे, तालुक्यामध्ये रणजीतदादांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. खर तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभेला रणजितसिंह यांना विरोध करायला नको होता. परंतु स्वताच्या राजकीय फायद्यासाठी तालुक्यातील जनतेचे फार मोठे नुकसान केले आहे, ही खंत तालुक्यातील जनतेला आहे. त्यामुळे या तालुक्याचा आमदार भाजपचा व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा करण्यासाठी आम्ही प्रवेश केला आहे. यापुढे तालुक्यात भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे सोनवलकर यांनी सांगितले.
पक्ष प्रवेश प्रसंगी तालुक्याचे युवा नेते शिवरूपराजे खर्डेकर, संतकृपा उद्योग समुहाचे चेअरमन व भाजप नेते विलासराव नलवडे ,पंचायत समिती माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन पाटील, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव सोनवलकर, सचिन चांगण , उत्तमराव सोनवलकर, लतीफभाई तांबोळी, मनोज कांबळे पाटील उपस्थित होते.
No comments