नायलॉन मांजाची विक्री व वापर करू नये अन्यथा कारवाई - पोलीस निरीक्षक शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना दुकानदारांनी नायलॉन मांजाची विक्री करू नये व साठा ठेवू नये तसेच पतंग उडवणाऱ्या व्यक्तींनी देखील नायलॉन मांजाचा वापर करू नये अन्यथा पोलिसांच्या कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, दिनांक ०९/०८/२०२४ रोजी नागपंचमी हा सण सर्वत्र साजरा होत असून, या सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात पतंग उडविण्यात येतात. अशावेळी नायलॉन मांजा वापरला जावू नये, यासाठी फलटण शहर पोलीस ठाणे कडून फलटण शहरातील पतंग - पतंगाचा दोरा विकणाऱ्या १५ व्यावसायिकांना नोटीस दिली असून, नायलॉन दोरा विकू नये असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या दुकानात तपास केला असता, नायलॉन मांजा मिळून आला नाही. नायलॉन मांजा शोधण्याची मोहीम या पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
तसेच पतंग उडविणाऱ्या व्यक्तींनी जर पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरला तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांचे तर्फे वरील विषयाबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात फलटण शहर पोलीसांनी सहभाग घेतला आहे.
No comments