फॉरेस्ट जमीन अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदू मुस्लिम वाद पेटवणाऱ्यावर कारवाई करा - फॉरेस्ट जमीन प्रश्नी सरडे ग्रामस्थांचा फलटण येथे मोर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - फॉरेस्ट जमीन अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा तथाकथित समाजसेवकांचा डाव असून पुसेसावळीच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा देखील संबंधितांचा डाव आहे, तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच फॉरेस्ट जमिनीत जवळजवळ २०० ते २४० कुटुंब १९७२ पासून राहत असल्याचे दाखले देत शासनाने ही अतिक्रमणे नियमित करावीत अशी मागणी प्रांताधिकारी फलटण यांच्याकडे सरडे तालुका फलटण येथील ग्रामस्थांनी मोर्चाद्वारे केली.
सरडे ग्रामस्थांनी काढलेला मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील चौकीतून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर आल्यानंतर सुखदेव बेलदार, रामदास शेंडगे, दत्तात्रय भोसले, दीपक शेंडगे, संजय जाधव, राजूभाई शेख, भाजपा तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव व ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मागणीचे निवेदन फलटण तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सरडे ग्रामस्थांच्या वतीने, उपविभागीय अधिकारी फलटण यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सरडे फॉरेस्ट मधील गट नं ६७९ येथे राहणारे सर्व ग्रामस्थ आपणास या मोर्चाद्वारे कळवू इच्छीतो कि, सरडे येथील गट नं ६७९ मधील जवळपास १२ एकर क्षेत्रावर २०० ते २५० कुटुंब एकूणलोकसंख्या १४०० ते १५०० एवढी मुस्लीम व हिंदू बांधवाची आहे, हे लोक १९७२ सालापासून - गुण्यागोविंदाने राहात असून, या ठिकाणी लोकांनी दगड,वीट, सिमेंट, लोखंडी पत्रा अशा स्वरुपाची पक्के बांधकाम केलेले आहे. या बांधकामाला ग्रामपंचायत कडून- असणारा कर आकारला जात आहे, त्याचबरोबर विद्युत महामंडळाकडून सर्व घरावरती वीज कनेक्शन देखील देण्यात आलेले आहे. तसेच ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा नळ कनेक्शन आहे. व केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेची पाईपलाईन देखील त्या भागामध्ये वितरीत करण्यात आलेली आहे. परंतु काही समाजकटकांनी या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी मा. वनमंत्री व वनविभाग - यांच्याकडे मागणी केली आहे. ही मागणी पूर्णपणे चुकीची आहे या मोर्चाद्वारे आम्ही समस्त ग्रामस्थाच्यावतीने खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत.
१) वनजमीन अतिक्रमणाच्या नावाखाली छुपा हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून सामजिक सलोखा बिघडवणाऱ्या स्वंमघोषित समाजसेवकावर कायदेशीर कार्यवाही व्हावी.
२) गट नं ६७९ मध्ये सर्व रहिवासाचे बांधकाम नियमित करण्यात यावे
३) गट नं ६७९ मधील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत अशा
प्रार्थनास्थळानां नियमित करण्यात यावे.
४) गावाला गावठाण उपलब्ध नसल्याने गट नं ६७९ मधील जागेला पर्यायी जागा म्हणून शेतीमहामंडळाची शिल्लक जमीन राज्यसरकारने केंद्रसरकारला द्यावी.
५) गट नं ६७९ मध्ये असलेल्या परंपरागत रस्ते पक्के करण्यासाठी विनाअट परवानगी देण्यात यावी.
६) वनविभागामार्फत सुरू असलेला सर्वे त्वरित थांबविण्यात यावा.
वरील सर्व मागण्याचा शासन दरबारी योग्य तो न्याय मिळावा.
No comments