Breaking News

वीज वितरण आणि पोलिस यंत्रणेने ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी मोहिम राबवा - आ. दिपकराव चव्हाण

Conduct an effective campaign to prevent theft of power transformers

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - खरिपासह ऊस, कापूस पिकांना पाण्याची जरुरी असताना, वीज ट्रान्सफॉर्मर चोरी मुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने, शेतकरी चिंताक्रांत झाला असून, वीज वितरण कंपनी आणि पोलिस यंत्रणेने ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याच्या स्पष्ट सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी दिल्या आहेत. 
       वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या येथील निवासस्थानी वीज वितरण कंपनी व पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत आ. दिपकराव चव्हाण बोलत होते.

    यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राऊत, अतिरीक्त कार्यकारी अभियंता (शहर) लोंढे, उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण)  देहरकर,  उपकार्यकारी अभियंता लोणंद रेड्डी  आणि शहर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, ग्रामीण पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, लोणंद पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले उपस्थित होते.
  पावसाळा समाधानकारक झाल्याने, नदी, नाले, ओढयांना पूर येऊन गेले, विहिरींमध्ये पाणी भरपूर असून यावर्षी ऊस, कापसासह संपूर्ण खरीप पिके जोमदार असताना वीजे अभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी पोलिस व महावितरण कंपनीने संयुक्त मोहिम राबवावी, गरज असेल तर पोलिस पाटील व ग्रामसुरक्षा दल आणि ज्या भागात वारंवार ट्रान्सफर्मर चोरी होते तेथील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पोलिस यंत्रणेने रात्रगस्त सुरु करावी अशा सूचनाही यावेळी आ. दिपकराव चव्हाण यांनी दिल्या आहेत.
    ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरी रोखण्यासाठी ज्या भागात चोरी होते तेथील शेतकऱ्यांनी लगेच पोलिस यंत्रणेशी संपर्क करावा, शेतकरी, पोलिस, वीज वितरण कंपनी यांची खास तुकडी तयार करुन किमान वारंवार चोरी होत असलेल्या भागात रात्र गस्त सुरु करण्याचे सूतोवाच कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी यावेळी केले.
      एप्रिल २०२४ ते आज अखेर फलटण विभागात २०० केव्हीए १, १०० केव्हीए ५६, ६३ केव्हीए ३५ आणि २५ केव्हीए १ असे एकूण ९३ ट्रान्सफॉर्मर चोरीस गेले असून त्यापैकी केवळ २९ नवीन उपलब्ध झाले आहेत, मात्र आणखी १०० केव्हीए ३६, ६३ केव्हीए २७ आणि २५ केव्हीए १ असे एकूण ६४ ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्यानंतर ते तातडीने बसवून वीज पुरवठा पूर्ववत करणे शक्य असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी बैठकीत स्पष्ट केले.

No comments