Breaking News

काँग्रेसने दलित समाजाचा फक्त वोटबँक म्हणून वापर केलाय - माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा ; भाजपने कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर मधील मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले

Congress has used Dalit community only as a vote bank - Former Union Minister Bhagwant Khuba

    फलटण (ॲड. रोहित अहिवळे) दि.२२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगामध्ये सर्वोत्कृष्ट संविधान आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील योगदान असून त्यांचे योगदान हा देश विसरू शकत नाही. मात्र काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दुरव्यवहार केला, त्यांना निवडणूकीत पाडण्याचे काम हे काँग्रेसने केलेले आहे. २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू, दीक्षाभूमी नागपूर, लंडन मधील घर तसेच चैत्यभूमी व  डॉ.बाबासाहेबांचे स्मारक मंजूर करून आंबेडकरी जनतेला न्याय देण्याचे काम हे भाजप सरकारने केले आहे, ५६ वर्षात काँग्रेस हे सर्व करू शकले असते आणि दलितांना न्याय देऊ शकले असते, परंतु काँग्रेसने दलित समाजाचा फक्त वोटबँक म्हणून वापर केला असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी केले.

    भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा आज दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी फलटण दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी मंगळवार पेठ येथे माजी नगरसेवक दत्ता अहिवळे व  प्रबुद्ध विद्या भवन शाळेला भगवंत खुबा यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत बेळगावचे नेते धनंजय जाधव, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा सातारा जिल्हा  सरचिटणीस जयकुमार शिंदे, रणजितसिंह भोसले, बजरंग गावडे, अमोल सस्ते, रमेश पवार, रियाजभाई इनामदार, आरपीआयचे विजय येवले उपस्थित होते.

    पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा म्हणाले, काँग्रेस या देशात ५६ वर्ष सत्तेत होती, मात्र त्यांनी या काळात दिन दलित व गोरगरीब यांच्यासाठी फक्त नारा देऊन, त्यांची दिशाभूल करून, निवडणुकीत मते घेण्याचे काम केले आहे. दीनदलित व गोरगरिबांनी काँग्रेसवर विश्वास ठेवून, काँग्रेसला निवडून दिले परंतु काँग्रेसने त्यांना न्याय दिला नाही. काँग्रेसने निवडणुकीत खोटे नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार असल्याचं खोटा प्रचार केला, भाजपा १० वर्षे सत्तेत आहे परंतु अद्याप एकही बदल संविधानात केला नाही, काँग्रेसने मात्र मागील ६० वर्षात ९० वेळा अमेंडमेंट करून संवेदनात बदल केला असल्याचे भगवंत खुबा यांनी सांगितले.

    राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी वक्तव्य केले असल्याचे सांगतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देण्याची व संविधान वाचवण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगून, भाजपने कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर मधील मागासवर्गीयांना आरक्षण मिळू  लागले असल्याचे खुबा यांनी स्पष्ट केले. भाजप सत्तेत आल्यानंतर सीएए कायदा आणून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील असुरक्षित गैर मुसलमानांना नागरिकत्व घेण्यासाठी कायदा अस्तित्वात असल्याचेही भगवंत खुबा यांनी सांगितले.

    ज्यावेळी बोलताना भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले की, गरीब - श्रीमंत उच्च- नीच या सर्वांना समानतेच्या धाग्यात बांधणे हे संविधानामुळेच शक्य झाले असून, चहा विकणारा मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला, ते देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे, आणि तेच संविधान भाजपा बदलणार असल्याचा खोटा प्रचार विरोधकांनी केला व जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला,  काँग्रेस व विरोधी पक्षाने केलेला  अपप्रचार तुम्ही सर्वांनी खोडून काढला पाहिजे असे आवाहन  करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना या देशातीलच नाही तर या जगातील कोणीच माणूस बदलू शकणार नाही  असे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष  धैर्यशील कदम यांनी सांगितले.

    सुरुवातीस माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे स्वागत दत्ता अहिवळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी  माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंगळवार पेठ येथे केलेली विकास कामे व प्रबुद्ध शाळेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी दत्ता अहिवळे यांनी आभार मानले.

No comments