कमिन्स कंपनीने भूमिपुत्रांना संपूर्ण वेतन अदा करावे,अन्यथा कंपनीला टाळे ठोकणार - सचिन कांबळे पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - कामगार मंत्री ना.सुरेश खाडे यांनी आदेश देऊनही कमिन्स कंपनी ने स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला दिला नाही. जर पूर्ण मोबदला दिला नाही तर येणाऱ्या काळात कमिन्स कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपचे विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत सचिन कांबळे पाटील बोलत होते, यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, जमिनी आमच्या, कामगार आमचे परंतु त्यांना चोविस हजार वेतन असताना कोणाला आठ,कोणाला दहा तर कोणाला तेरा हजार वेतन मिळत असून वरील रक्कम ठेकेदाराच्या घशात जात असून, याबाबत स्वतः कामगार मंत्री ना.सुरेश खाडे यांनी कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना या बाबत दखल घेण्याच्या समक्ष सूचना कोळकी ता.फलटण येथील विश्रामगृहात दिल्या होत्या, मात्र अद्यापही त्याची योग्य ती दखल कंपनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसून, मंत्री महोदय यांच्या सुचनेचे पालन केले जात नसून, त्यांची भूमिका संशयास्पद व ठेकेदार धार्जिनी असल्याचे स्पष्ट केले व या बाबत लवकरात लवकर संपूर्ण वेतन म्हणजे सरसकट चोवीस हजार द्यावेत अशी मागणी केली व ही मागणी येणाऱ्या तीन ते चार दिवसांत या बाबत लेखी खुलासा न केल्यास अथवा योग्य ती दखल न घेतल्यास, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कमिन्स कंपनीला टाळे ठोकू असे सचिन कांबळे पाटील यांनी निक्षून सांगितले आहे.
No comments