राज्यातील ११ कोटी जनतेच्या हिताबरोबर राष्ट्रहितासाठी महाराष्ट्रात महायुती सरकार निवडून द्या : माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 23 : महाराष्ट्र राज्यातील ११ कोटी जनतेच्या हिताबरोबर राष्ट्रहितासाठी विरोधी पक्षांचे षडयंत्र रोखून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार सत्तेवर आले पाहिजे, त्यासाठी युती मधील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून या निवडणुकीचे महत्व समजावून द्यावे अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री भाजप सातारा जिल्हा प्रभारी भगवंत खुबा यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांच्या अपेक्षा, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सूचना, मतदार संघातील प्रलंबीत प्रश्न, झालेली विकास कामे यांची माहिती घेऊन आगामी विधानसभा निवडणूकिसाठी चोख नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदार संघाचे संपर्क दौरे सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून बिदर (कर्नाटक) येथून सलग दोनवेळा लोकसभेत पोहोचून केंद्रात मंत्री झालेले, मात्र यावेळी पराभवाचा सामना करावा लागलेले, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी जिल्हा प्रभारी या नात्याने २५५ फलटण (अजा) विधानसभा मतदार संघातील काही गावांचा दौरा नुकताच केला, त्यांच्या समवेत भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा सह प्रभारी संजय जाधव (बेळगाव) हे होते.
या दौऱ्यात दुधेबावी, ता. फलटण येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना भगवंत खुबा बोलत होते.
विरोधी पक्षांचा अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न
भाजपला गत लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व मित्र पक्ष यांचे आचार, विचार आणि वक्तव्य पाहता विदेशी ताकदीची मदत घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, खा. राहुल गांधी यांनी परदेशात बसून भारतातील आरक्षण रद्द करा, आरक्षण आहे तोवर भारत समृध्द होणार नसल्याचे वक्तव्य केले, त्यांना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे निदर्शनास आणून देत ते महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे भगवंत खुबा यांनी स्पष्ट केले.
प्रथम क्रमांकावरचे राज्य तिसऱ्या/चौथ्या क्रमांकावर पोहोचले
सन २०१९ च्या निवडणुकीत भाजप सोबत असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे यांना ६७ जागा मिळाल्या, त्याचा फायदा घेऊन खा. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत मुख्यमंत्री पदावर बसविले आणि भाजपला एक धक्का दिला, त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मेहनतीने बदल घडवून विकास कामात आणि आर्थिक स्थितीत प्रथम क्रमांकावर आणलेले हे राज्य चुकीच्या कामकाज पद्धतीमुळे ३/४ क्रमांकावर गेले.
आमदारांनी बदल घडविला तो कायम ठेवा
राज्यातील आमदारांना महाराष्ट्राची ही पीछे हाट मान्य नसल्याने त्यांनी सरकार मधून बाहेर पडून घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे सरकार गेले, त्यानंतर स्थिती सुधारत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत जागरुकपणे मतदान करुन मागे विस्कटलेली घडी पुन्हा विस्कटणार नाही यासाठी जबाबदारीने सर्वांनी काम करण्याची आणि पुन्हा भाजपला सत्ता देण्याची आवश्यकता भगवंत खुबा यांनी स्पष्टपणे नमूद केली.
माणिकराव प्रमाणे अनेकजण उत्सुक
सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या प्रमाणे या मतदार संघातील अनेकांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक भाजप करु शकते याची खात्री पटल्याने भाजप प्रवेशासाठी अनेकजण उत्सुक आहेत, सोनवलकर यांनी स्वतःच्या हितापेक्षा राज्याचे हित लक्षात घेऊन घेतलेला निर्णय उपयुक्त व प्रेरणादायी असल्याने भाजप पुन्हा सत्तारुढ होत असताना मतदारांची मजबुत साथ लभण्यासाठी सर्वांनी एक विचाराने प्रयत्न करावेत असे आवाहन भगवंत खुबा यांनी केले.
माणिकराव यांच्या मागण्या वरिष्ठांसमोर ठेवणार
माणिकराव सोनवलकर यांनी दुधेबावी जिल्हा परिषद गटातील ४ प्रमुख समस्या/मागण्या मांडल्या त्याबाबत जिल्हाध्यक्ष व आपण स्वतः पक्ष पातळीवर वरिष्टांसमोर मांडून योग्य निर्णय होतील याची ग्वाही त्यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील सर्व ८ जागा महायुती जिंकणार
सातारा जिल्ह्यातील सर्व ८ विधानसभा मतदार संघात राज्यातील महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याची ग्वाही देत त्यापैकी ५ भाजपचे असतील असे मत भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्याला संधी देणारा आणि जात धर्म न पाहणारा पक्ष
भारतीय जनता पक्ष हा नाव, आडनाव, जात, धर्म, पंथ यापेक्षा कर्तृत्वाला संधी देणारा, त्याचा विचार करणारा पक्ष असल्याचे आपल्या पक्ष प्रवेशानंतरच्या गेल्या एक सव्वा महिन्याच्या कालावधीत लक्षात आल्याचे नमूद करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रथम भेट झाली, त्यावेळी झालेली चर्चा, त्यांनी दिलेला विश्वास आणि कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष असल्याची खात्री झाल्यानेच आपण या पक्षात प्रवेश केल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी स्पष्ट केले.
कोळकी गट विधानसभेत भरीव साथ करणार
कोळकी जिल्हा परिषद गटात २ पंचायत समिती गण आणि १७ गावे आहेत, गत लोकसभा निवडणुकीत या गटातून भाजप उमेदवाराला २५०० मताधिक्य मिळाले, यावेळी त्यामध्ये भरीव वाढ निश्चित होईल याची खात्री माणिकराव सोनवलकर यांनी दिली.
औद्योगिक वसाहत जमिनीचा योग्य मोबदला द्या
या भागातील शेती पाण्याचा प्रश्न सोडविताना नीरा - देवघर प्रकल्पातील ०.९३ टीएमसी पाणी या प्रकल्पात टाकण्याचा महत्वाचा निर्णय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत चिकाटीने मंजूर करुन घेऊन त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरु केल्याचे नमूद करताना या भागात नाईकबोमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहत भूसंपादन प्रकरणी लोकांना योग्य मोबदला व अन्य सुविधा मिळाव्यात अशी आग्रही मागणी माणिकराव सोनवलकर यांनी केली.
मराठा व धनगर आरक्षण अन्य आरक्षणाला धक्का न लावता द्या
या जिल्हा परिषद गटात बहुसंख्य गावे धनगर समाजाची असल्याचे निदर्शनास आणून देत या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला साथ करावी, अन्य कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमची घटनात्मक मागणी पूर्ण करावी, ओबीसी मूळ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला मागणी प्रमाणे आरक्षण मिळावे या ४ प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची मागणी माणिकराव सोनवलकर यांनी पक्ष निरीक्षक भगवंत खुबा व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे भागाच्यावतीने केल्या.
प्रारंभी माजी जिल्हा परिषद सदस्य व दुधेबावीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भावनाताई सोनवलकर व त्यांच्या सहकारी महिलांनी भगवंत खुबा, धैर्यशील कदम, संजय जाधव यांचे औक्षण केले, त्यानंतर पै. बजरंग गावडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर दुधेबावी ग्रामस्थांच्यावतीने फेटे बाधून व शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सर्वाचे स्वागत करण्यात आले.
फलटण मतदार संघाची उमेदवारी भाजपला मिळावी
या मतदार संघात भाजप विधानसभा निश्चित जिंकणार पण त्यासाठी ही जागा महायुतीने भाजपला द्यावी यासाठी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पुढाकार घ्यावा अशी आग्रही मागणी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केली. त्यांनी समारोप व आभार मानले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, संदीप चोरमले, सचिन अहिवळे, अमोल सस्ते, अजय माळवे यांच्यासह गोपाळराव सोनवलकर, त्रिंबक सोनवलकर, लक्ष्मण सोनवलकर, संदीप बुधनवर नानासाहेब आडके, संतोष सोनवलकर, उत्तम सोनवलकर, रजनीकांत नाळे, अतुल पवार, युवराज सोनवलकर, रवींद्र शिंदे, भाऊसाहेब बुधनवर आणि दुधेबावी येथील प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : माजी केंद्रीय मंत्री, भाजप सातारा जिल्हा प्रभारी भगवंत खुबा बोलताना, शेजारी धैर्यशील कदम, माणिकराव सोनवलकर, जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, संजय जाधव वगैरे.
No comments