प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांचा ५० वा समाधी सोहोळा धार्मिक उपक्रमांद्वारे संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. २५ : प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था, फलटण आणि भक्त मंडळी यांच्या संयुक्त सहभागाने 'श्रीं'च्या ५० व्या समाधी सोहोळा उत्सवानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. १८ ते २५ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते, ते सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचे मंदिर संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
या कालावधीत दररोज दुपारी ४ वाजता फलटण शहरातील दादा महाराज भजनी मंडळ, शारदा महिला भजनी मंडळ, सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, लीलावती महिला भजनी मंडळ, नामसाधना ध्यान आरती मंडळ, केशवस्मृती महिला भजनी मंडळ यांचे भजन, दररोज सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. सुरेश महाराज नाळे कोळकी, ह.भ.प. शंकर महाराज आळंदी, ह.भ.प. जयवंत महाराज भोईटे हिंगणगाव, ह.भ.प. सौ. पुष्पाताई कदम फलटण, ह.भ.प. सोमनाथ महाराज घोगरे शिंदेवाडी, ह.भ.प. धैर्यशील महाराज देशमुख तथा भाऊ नातेपुते यांची प्रवचने आणि दररोज सायंकाळी ७.३० वा ह. भ. प. पोपट महाराज भोसले अनपटवाडी खटाव, ह. भ. प. अरुण महाराज पुंडे राशीन कर्जत, ह. भ. प. तुकाराम महाराज उराडे नातेपुते, ह. भ. प. श्रीपाद महाराज जाधव सातारा, ह. भ. प. विष्णू महाराज टेंभूकर पंढरपूर, ह. भ. प. सुरेश महाराज सुळ अकलूज यांची कीर्तन सेवा झाली.
मंगळवार दि. २४ रोजी ह.भ.प. कमलाकर महाराज भादोले निमसोड ता. खटाव यांचे फुलाचे कीर्तन व त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. बुधवार दि.२५ रोजी ह.भ.प. नंदकुमार महाराज कुमठेकर सासवड यांचे काल्याचे कीर्तन झाले.
या सोहोळया दरम्यान मुंबई येथील ख्यातनाम गायिका सौ. मिताली प्रभुणे यांचा भक्ति संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यांच्या सुश्राव्य गायनामुळे समाधी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात भर पडली. ७ दिवस प. पू. उपळेकर महाराजांचे समाधी स्थान भक्तीमय झाले होते.
प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांचा ५० वा समाधी सोहोळा वरील प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात गेला सप्ताहभर साजरा करण्यात आल्यानंतर प.पू. गोविंद महाराज उपळेकर महाराज प्रतिमा व पादुकांसह शहरातील प्रमुख मार्गावरुन रथ सोहोळा संपन्न झाल्याचे व त्यामध्ये देवस्थानचे ट्रस्टी आणि भाविक स्त्री - पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नगर प्रदक्षिणे दरम्यान रथ सोहोळा शहरातील श्रीराम मंदिर, सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर, उघडा मारुती मंदिर, ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पोहोचल्यानंतर तेथे आरती करण्यात आली.
सायंकाळी रथ सोहोळा प.पू. गोविंद महाराज समाधी मंदिर येथे पोहोचल्यानंतर तेथे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.
या सोहळ्यास सहभागी सर्वांचे संस्थेमार्फत ऋण व्यक्त करताना प.पू. उपळेकर महाराज समाधी मंदिर संस्थेचा कणा अनेक दानशूर श्रद्धाळू भक्त असून समाधी मंदिर ते आजपर्यंत बांधून झालेली ३ मजली इमारत सर्वांच्या सढळ हातामुळे शक्य झाल्याचे, तसेच श्रीमती कौलगुड यांनी मंदिर सभागृह आहे तो प्लॉट विनामूल्य मंदिर संस्थेला देणगी रुपाने दिला हे सर्व भक्तांच्या सहकार्यामुळे घडले, प्रत्येक सोहळ्यात भक्तांनी अन्नदानास हातभार लावल्यामुळे व त्यांनी विश्वस्त मंडळावर टाकलेल्या विश्वासामुळे निर्विघ्नपणे सर्व कार्यक्रम पार पडल्याचे संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
इतिहासाची पुनरावृत्ती असे समजावे का : श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर
५० वर्षांपूर्वी भाद्रपद कृष्ण अष्टमी दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी प. पू. उपळेकर महाराज यांनी देह त्यागला. दुसऱ्या दिवशी नवमीला त्यांना समाधीस्थ करण्यात आले.
मला अजूनही त्यावेळचे स्पष्ट आठवते व फलटण मधील समाधी सोहळ्याचे साक्षीदार त्यांनाही आठवत असेल दुपारी दोन अडीच नंतर आभाळ भरुन आले व पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली, भर पावसात मिरवणूक निघाली होती तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी यांची समाधीसाठी परवानगी आणल्यानंतर आज समाधी आहे, त्या ठिकाणी विधीवत माती खोदली गेली पाऊस थांबलाच नव्हता, तो ही हा समाधी सोहळा पाहण्यास जातीने हजर होता.
खोदलेल्या खड्ड्यात पोतीच्या पोती मीठ घालण्यात आले, नंतर देह ठेवला गेला व रातोरात समाधी बांधण्यात आली. अनेक भक्त समाधी बांधून होईपर्यंत पावसात भिजत उभे राहिले होते. काल नगर प्रदक्षिणेवेळी पावसाची चिन्हे होती थेंबही पडले परंतू प.पू. उपळेकर महाराजांच्या पादुकांची नगर प्रदक्षिणा रथातून निर्विघ्नपणे पार पडली.
No comments