Breaking News

नीरा देवघर व धोम बलकवडी प्रकल्प रामराजेंची देण आहे ; लोक कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कटिबद्ध - अजित पवार

Grand Alliance government has succeeded in advancing the concept of welfare state - Ajit Pawar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.5 - महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य असून येथील जनतेला मूलभूत सुविधा देण्याबरोबर त्यांच्या अपेक्षा, गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असताना विरोधक त्यावर टीका टिप्पणी करुन अडथळा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, तथापि त्याकडे दुर्लक्ष करुन राज्यातील महायुतीचे सरकार कल्याणकारी राज्य ही संकल्पना पुढे नेण्यात यशस्वी झाल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार यांनी दिली आहे.

    जन सन्मान योजनेचे स्वागत आणि महिला मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, आ. दिपक चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर, अमित कदम आदी मान्यवरांसह राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

    महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे विविध खात्यांची  जबाबदारी आपण समर्थपणे सांभाळताना लोकांच्या अपेक्षा, अडचणी यांचा बारकाईने अभ्यास केला असल्याने सबंधीत विभागाचा मंत्री म्हणून आपण अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याचे निदर्शनास आणून देताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, लाडकी बहिण, किंवा शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा योजना तयार करुन  त्यासाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने ती यशस्वी होत आहे, अशा असंख्य योजनांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर आपल्याला समाधान वाटते, आणि त्या योजना अधिक प्रभावी रीतीने राबवून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्हा सर्वांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून ना. अजित पवार म्हणाले, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण वगैरे विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना प्राधान्याने मिळाल्या पाहिजेत यासाठी तर महायुतीचे सरकार कोठेच कमी पडणार नाही तथापि त्यापलीकडे जाऊन लोकांच्या अपेक्षा, अडचणी सोडविण्यासाठी या राज्यात शेती पंपांसाठी दिवसा योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा, शेतकरी सन्मान योजनेद्वारे काही तरतुदी, लाडकी बहिण सारख्या महिलांना आधार देणारी योजना, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना प्रभावीरीतीने राबविण्यात येत असून राज्याचा अर्थमंत्री म्हणून आपण या सर्व योजनांसाठी आर्थिक अडचण येऊ देणार नाही.

    नीरा - देवघर, धोम - बलकवडी हे प्रकल्प फलटण प्रमाणेच अन्य कायम दुष्काळी तालुक्यांसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची देणं असल्याचे निदर्शनास आणून देत यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या समजुती काढून त्यांना लाभक्षेत्रात आणण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही मात्र, आ. रामराजे यांनी अत्यंत प्रयत्न पूर्वक या मंडळींशी प्रसंगी रात्री अपरात्री त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रकल्पासाठी सहमती देण्यास तयार केले म्हणून हे महत्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले, त्याचे पाणी कायम दुष्काळी पट्ट्यात पोहोचत असल्याचे निदर्शनास आणून देताना नीरा - देवघर व धोम - बलकवडी कालवा जोड प्रकल्प ही पहिलीच संकल्पना असून ती ही यशस्वी होत आहे, डोंगर दऱ्यातून अनेक बोगदे काढून पाणी लाभ क्षेत्रात पोहचविण्याची संकल्पना आ. रामराजे यांच्या प्रयत्नाचे फलित असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे या भागातील लोकांसाठी आळंदी - पंढरपूर - मोहोळ राष्ट्रीय महामार्गाची (पालखी महामार्ग) निर्मिती, बारामती - फलटण रेल्वे मार्गाची पूर्तता होत असताना स्वातंत्र्यपूर्व काळापासून रखडलेल्या  फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गांची पूर्तता करण्यासाठी ९२१ कोटी रुपयांच्या ५० टक्के खर्चाची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली असून सदर मार्ग गतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर वाढत्या वाहतुकीचा ताण शहरातील वाहतुकीवर येणार नाही यासाठी रिंगरोडची संकल्पना यशस्वी होत असून त्यासाठी फलटण मतदार संघात भरीव तरतूद केल्याचे तर तीर्थ क्षेत्र विकास योजनेतून फलटण शहरातील पुरातन मंदिरे, कांबळेश्वर मंदिर परिसर, फलटण शहरातील महानुभाव पंथ, जैन समाज व हिंदू मंदिरे व परिसर विकासाला निधीची तरतूद करण्यात येत असल्याचे ना. अजित पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

    लाडकी बहिण योजने साठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत या योजनेसाठी पैसे कमी पडू देणार नसल्याचे सांगताना या राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याने सदर योजना पुढे अखंडित सुरु ठेवण्याची ग्वाही देत आगामी निवडणुकात महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले, महाराष्ट्रात १ कोटी ६० लाख महिला आणि सातारा जिल्ह्यात ८८ हजार महिला पात्र लाभार्थी ठरल्या असून त्यामध्ये वाढ होत आहे आतापर्यंत त्यापैकी सातारा जिल्ह्यात ६० हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून उर्वरित खात्यावर ही जमा होतील याची ग्वाही ना. अजित पवार यांनी यावेळी दिली.

    छ.शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन शासन चालविताना त्यांचे आदर्श, त्यांचे विचार जोपासत सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडवायचा ही स्व. यशवंतराव चव्हाण यांची शिकवण जोपासण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ना. अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

    विकासाचा ध्यास घेतलेले, सर्वसामान्यांचे भले करण्याची भावना, त्यासाठीची तळमळ आमच्या मध्ये असल्याने लोक कल्याणकारी कोणतीही योजना निधी अभावी रखडणार नाही याची खात्री देत आगामी निवडणुकांमध्ये अनेक हवसे, गवसे, नवसे समोर येतील, आव्हाने करतील पण आम्ही आमचे कर्तृत्व कृतीतून दाखवून दिले आहे, या मतदार संघातील तुमचे प्रतिनिधी आ. दिपक चव्हाण हे अत्यंत उत्तम काम करणारे लोकप्रतिनिधी असल्याने त्याना तुमचा पाठिंबा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ना. अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

    प्रारंभी रुपाली चाकणकर यांनी महायुती शासनाच्या महिला विषयक धोरणाची वाहव्वा करताना प्रत्येक योजनेत महिलेला सर्वाधिक लाभ, तिचे संरक्षण, तिला पाठिंबा आणि पाठबळ देण्यात हे सरकार कमी पडत नसल्याचे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. माजी सभापती सौ. रेश्मा भोसले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले तर प्रमोद रणवरे यांनी सूत्र संचालन केले.

    कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments