कोळकी येथे हॉटेल कामगाराचा खून ; दोघांना अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - दि.१२/०९/२०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास कोळकी ता.फलटण येथील दहीवडी व शिंगणापूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकातील पानटपरी चे मालक अमोल वनारे, वय २८ वर्षे, रा. कोळकी व त्याचा मित्र सलमान रफीक शेख, रा. सोनवडी, ता. फलटण हे दोघे यामाहा मोटर सायकलवर जेवणाचे पार्सल नेण्यासाठी हॉटेल आमंत्रण, कोळकी येथे आले होते. त्यावेळी अमोल वनारे याने चिकन तंदुर थाळी, ५ रोटी व २ भाकरी घेण्यासाठी ऑर्डर दिली. त्यावेळी आमंत्रण हॉटेल मधील कामगार विपूल उर्फ डॉन मुर्म, रा. उडीसा राज्य (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यास हॉटेल मॅनेजर श्री अक्षय भालचंद्र काळे, वय ३२ वर्षे यांनी रोटी व भाकरी पॅक करण्यासाठी कागद आणण्यासाठी विपूल उर्फ डॉन मुर्म यास सांगीतले. त्यावेळी विपूल उर्फ डॉन मुर्म याने श्री अक्षय भालचंद्र काळे यास काहीतरी बोलुन दुर्लक्ष केल्याने, अमोल वनारे याने विपूल उर्फ डॉन मुर्म याच्या डोक्यात टपली मारली. त्यावरुन त्यांच्यामध्ये झटापट झाली. त्यावेळी सलमान रफीक शेख याने सुध्दा विपूल उर्फ डॉन मुर्म यास मारहाण केली. या झटापटीत अमोल वनारे यांने तेथील लोखंडी सळईने विपूल उर्फ डॉन मुर्म याच्या डोक्यात व शरीरावर मारहाण केली. त्यामुळे विपूल उर्फ डॉन मुर्म हा गंभीर जखमी झाला. जखमी विपूल उर्फ डॉन मुर्म यास जीवनज्योती हॉस्पीटल, कोळकी येथे दाखल केले. पुढील औषधोपचारासाठी विपूल उर्फ डॉन मुर्म यास ससुन हॉस्पीटल, पुणे येथे नेले असता, त्यास रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तो मयत झाला.
सदर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना माहिती सांगीतली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक. नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड आणि पोलीस अंमलदारांची तीन पथके बनविली. सपोनि. नितीन शिंदे हे पुणे येथील तपासकामी रवाना झाले. गुन्ह्याचे घटनास्थळ हॉटेल आमंत्रण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली आहे.
सदर गुन्ह्यातील दोन्ही संशयीत आरोपींकडे चौकशी सुरु आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पो.हवा. चंद्रकांत थापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, नाना होले, मल्हारी भिसे, म.पो.ना. हेमा पवार, पो.शि. स्वप्नील खराडे, अतुल बढे, महेश जगदाळे, अनिल देशमुख व इतर पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्यातील मयत झालेली व्यक्ती विपूल उर्फ डॉन मुर्म, रा. उडीसा याच्याबाबत कोणास काही माहिती असल्यास, त्याबाबत पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
No comments