अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे - श्रीमंत रामराजे यांनी कार्यकर्ता बैठकीत दिला इशारा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१- माजी खासदारांनी हॉटेल निसर्ग मध्ये बसून, आपला उमेदवार भाजपच्या पहिल्या यादीत येणार असल्याचे सांगून गेल्याचे माझ्या कानावर आले आहे, त्यामुळे मला असा प्रश्न पडतो की, आपण महायुतीत राहायचे का, ते हे कोण ठरवणार? ते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वर गेलेत का? की सातारा जिल्ह्याची युती वेगळी व विदर्भाची वेगळी असे काही आहे का? या सर्वांचा उहापोह अजितदादांच्या समवेत चर्चा करून करणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
रणजीतसिंह नाईक निंबाळकर व त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत निर्माण करतात त्यांच्या विरोधात आपली तक्रार आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टी कडून साथ मिळू नये एवढीच आपली तक्रार आहे आणि ही तक्रार आपण अजित पवारांच्या कानावर घालू आणि यामध्ये जर काहीच फरक झाला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे असा इशारा देखील विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
फलटण येथे आज दि.१ सप्टेंबर रोजी लक्ष्मी विलास या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी खासदार व माणचे आमदार यांच्यासमोर मी सांगितले होते की, आम्हाला काम करता येणार नाही. माझ्या आई-वडिलांबद्दल अपशब्द काढलेल्यांच्या स्टेजवर मी बसणार नसल्याचे सांगितले होते. लपून छापून खासदारकीला कुठलेही काम आपल्याकडून झालेली नाही,
माजी खासदारांनी जो गवगवा केला होता की, मी पाणी आणलं, निरा देवघर आणलं, मोदींपेक्षा जास्त निधी आणला, तर करमाळ्यात ४१ हजार व माढ्यात ५१ हजाराचं लीड पडलच नसते असा उपरोधिक टोला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.
जे पक्ष सोडून गेले त्याबद्दल आमची काही हरकत नाही, परंतु पक्ष सोडून गेलेल्यांना पद द्यायचं काय कारण आहे? त्याचबरोबर कामगार मंत्री सुरेश खाडे फलटणला येऊन सरकारी योजना राबवतात आणि कामगारांचे रजिस्ट्रेशन आपले जास्त असताना देखील जर आपल्याला बोलवत नसतील आणि उलट पक्षी कमिन्स सारख्या इंटरनॅशनल कंपनीची चौकशी लावून जात असतील तर आम्ही वागायचे कसे? आम्ही महायुतीत आहोत का बाहेर आहोत असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांचे आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे २ तारखेला आपल्याकडे येणार आहेत. त्यावेळी आपण स्वतंत्र वेळ घेऊन याबद्दल चर्चा करू असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments