फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना तत्काळ लाभ द्यावा - कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. २ : फलटण जिल्हा सातारा येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे ३ हजार ६०० प्रलंबित लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवून लाभ देण्यात यावा असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
फलटण जिल्हा सातारा येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते नियमितपणे मिळण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री मुंडे बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, फलटण कृषी विभागीय अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी श्री.मुंडे म्हणाले, फलटण जिल्हा सातारा येथील पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुमारे ३ हजार ६०० लाभार्थींना भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी व बॅंक खाती आधार संलग्न व इतर अनुषंगिक बाबींमुळे लाभ मिळण्यास अडचणी येतात. या अडचणी विभागाने तत्काळ सोडवून लाभ देण्यात यावा.तसेच यासाठी लागणारे अतिरिक्त कर्मचारी तत्काळ उपलब्ध करून घ्यावेत असे ही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.
No comments