Breaking News

सातारा-लोणंद मार्गावर शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन ; आठ दिवसांचा दिला अल्टीमेटम

Shiv Sena Thackeray group agitation on Satara-Lonand road; An ultimatum of eight days was given

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ -  सातारा-लोणंद महामार्गावरील वेण्णा नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ वाढे येथील वेण्णा नदीच्या पुलावर प्रशासनाचा जाहीर निषेध करीत गुरुवारी वेण्णा नदीच्या पुलावरती झाडे लावून निषेध करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्ड्यात झाडे लावण्यात आली. पुढील आठ दिवसांमध्ये खड्डे न भरल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ नलावडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

    आंदोलनस्थळी बोलताना दत्ताभाऊ नलावडे म्हणाले सातारा-लोणंद मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दररोज अपघातांचा सामना करावा लागतो आहे. खड्डे भरण्यासाठी चार महिन्यांपासून वाढे ग्रामपंचायत आणि या भागातील नागरीकांच्यावतीने वारंवार जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित रस्ते महामंडळ यांच्याशी पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाची परिस्थिती खुप दयनीय झाली आहे. या मार्गावरती दहा फुटांचे खड्डे पडले आहेत. त्याच मार्गावरुन सगळेजण आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.  संबंधित लोकप्रतिनिधींनी या मार्गाची दुरावस्था आणि वाहनचालकांची गैरसाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

    या आंदोलनाला तालुकाप्रमुख रमेश बोराटे, युवराज  नलावडे, उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे, सातारा शहर प्रमुख गणेश अहिवळे, मेजर रविंद्र शेळके, प्रमुख संभाजी वाघमळे, सागर नलावडे, मनोज नलावडे, साहिल पिसाळ, सुजित जगताप, मयूर ननावरे, गणेश नलवडे, श्रीकांत (आबा) नलवडे, आण्णा निगडे, गणेश नलावडे यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments