Breaking News

डीपी चोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एसपी व महावितरणचे अधीक्षक यांच्याशी श्रीमंत रामराजे यांची बैठक

Shrimant Ramraje meeting with SP and Superintendent of Mahavitaran to control DP theft

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात होणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या रोहित्र (डीपी) चोरी संदर्भात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा जिल्ह्याचे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्या समवेत सातारा सरकारी गेस्ट हाऊस येथे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत रोहित्र (डीपी) चोरीच्या घटना कशा नियंत्रणात आणल्या जातील यासंदर्भात सखोल चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने रात्री शस्त्रधारी पोलीस कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी यांची गस्त वाढवणे. रोहित्र (डीपी) नुसार तेथील शेतकरी यांची मीटिंग घेऊन जर रात्री अपरात्री सप्लाय बंद झाला तर त्वरित पोलीस कार्यालय व महावितरण कार्यालय यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधणे, याबाबत जागृत करणे. आतापर्यंत सदर घटनेमध्ये ज्या टोळ्या पकडल्या त्यांच्यावर लक्ष ठेवणे. महावितरणचे नवीन येणारे सब स्टेशन हे 33/11केव्ही वोल्टेज लेव्हलला उभारणे व टप्प्याटप्प्याने सर्व 22 केव्ही लाईन हया 11 केव्ही लेवलला रुपांतरित करणे. आतापर्यंत जिल्ह्यातील पकडलेला सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन महावितरणच्या ताब्यात देणे. सदर बैठकीत 22 केव्ही लाईन ही 11 केव्ही लाइनवर रुपांतरित केल्याने, सर्व तांब्याचे रोहित्र (डीपी) बदलून अल्युमिनियम रोहित्र (डीपी) टाकावे लागतील, त्यामुळे आपोआपच रोहित्रांची (डीपी) चोरी कमी होणार आहे. या संदर्भात श्रीमंत रामराजे यांनी यापुढे जेथे शक्य आहे, तेथे महावितरण चे सर्व नेटवर्क 11 केव्ही वोल्टेज लेव्हलवर उभारावे असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. सदर बैठकीस फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, महावितरणचे फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये, महावितरण फलटण ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर, लोणंद उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments